राज्यसभेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार जाहीर
वृत्तसंस्था/ चेन्नई
देशाच्या विविध राज्यांसाठीच्या राज्यसभा जागांवर होत असलेल्या निवडणुकीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. तामिळनाडूत द्रमुकने काँग्रेसचा अपेक्षाभंग करत दोन्ही जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रातील एकमेव जागेसाठी काँग्रेसचे दिग्गज प्रयत्नशील आहेत. तामिळनाडूच्या दोन तर पुड्डुचेरी, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी एका जागेकरता 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेस पक्ष दोन जागांकरता निवडणूक लढविणार होता. चार महिन्यांपूर्वी तामिळनाडू विधानसभ्घ निवडणुकीवेळी द्रमुकने काँग्रेसला राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते.
तामिळनाडूच्या एका जागेसाठी प्रयत्नशील काँग्रेसच्या 6 हून अधिक नेत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. द्रमुकने डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू आणि केआरएन राजेशकुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
द्रमुकच्या घोषणेमुळे सर्वात मोठा झटका गुलाम नबी आझाद यांना बसला आहे. काँग्रेसच्या असंतुष्ट जी-23 गटाचे नेतृत्व करणारे आझाद हे तामिळनाडूतून राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील होते. तर पक्षनेतृत्व डाटा ऍनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांना उमेदवारी देण्याचा विचार करत होते.