गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांचे संकेत
प्रतिनिधी / पणजी
भाजपला हरविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी लोकांचीच इच्छा आहे. त्यानुसार येत्या पालिका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही काँग्रेस पक्षाशी युती करू शकतो, असे मत गोवा फॉरवर्डचे नेते फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
पक्षाच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढविण्याची धमक भाजपमध्ये राहिलेली नाही. मतदान ईव्हीएमतून न होता मतपत्रिकेद्वारे होणार आहे. त्यामुळे आपण पराभूत होऊ, अशी भीती सतावू लागल्याने भाजपने तो निर्णय बदलला, अशी टीकाही सरदेसाई यांनी केली.
पेडणेचे माजी नगरसेवक तथा राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्यकाळात भाजप मंडळ अध्यक्ष राहिलेले प्रशांत गडेकर यांना गुरुवारी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमानंतर पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सरदेसाई बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर विनोद पालयेकर, किरण कांदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
…तर राष्ट्रवादीशी युती नाही
काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आमदारांनी राष्ट्रवादीत यावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. अशावेळी आम्ही त्यांच्याशी युती करूच शकणार नाही. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या एक सुद्धा फुटीर आमदाराचा राष्ट्रवादीने स्वीकार केला, तर आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने सर्व नवीन चेहऱयांना उमेदवारी दिली तरच युतीचा विचार केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एका बाजूने दहा हजार नोकऱयांची घोषणा करण्यात येते तर दुसऱया बाजूने कोकणीची अट शिथील करण्यात येते. म्हणजे नोकऱया नक्की कुणाला देणार? महाराष्ट्रातील लोकांना का? असे प्रश्न निर्माण होतात. याच पद्धतीने मोपा विमानतळासंबंधीही पेडणेत व दोडामार्ग येथे विसंगत विधाने करण्यात येतात, यावरून सरकारची गोंधळलेली स्थितीही दिसून येते व सरकारला स्वतःचे प्राधान्यक्रमच माहीत नाहीत हेही स्पष्ट होते, असे सरदेसाई म्हणाले.
मला स्वतःला विरोधी पक्षनेता बनण्याची इच्छा नाही. तरीही विफ्रेड डिसा आणि क्लाफास डायस या भाजप आमदारांनी काँग्रेस पक्ष अस्तित्वातच नाही, असा दावा करून न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यावरून विधानसभेत विरोधी पक्ष कोणता, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रतिज्ञापत्रामुळे मोठा परिणाम सभागृहातील स्थितीवरही होतो, असे विजय सरदेसाई म्हणाले.
पेडणेतील भाजप मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी अन्य पक्षात जातात यावरून भाजप कार्यकारिणीने गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, मडगाव पालिका गत निवडणुकीत दिगंबर कामत यांच्या पॅनलशी सामंजस्याने आम्ही निवडणूक लढविली होती. त्याच धर्तीवर यावेळीही एकत्रच निवडणूक लढविणार आहोत. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीवेळी देखील एकत्र राहावे या पद्धतीने बोलणी सुरू आहेत. त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच आपण कामत यांच्याशी बोललो आहे, असे सरदेसाई म्हणाले.
पणजीत पालिका निवडणुकीत उतरावे की नाही याबद्दल अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यादृष्टीने अद्याप कुणी संपर्कही केलेला नाही. तरीही पेडणेत पालिका निवडणुकीत आम्ही सर्व दहाही जागा लढवणार आहोत. त्याचबरोबर म्हापसा पालिकेसाठी तीन प्रभागात उमेदवार ठेवणार आहोत, असे सरदेसाई यांनी सांगितले.
आमदाराच्या माफियाराजला पेडणेकर कंटाळले
विद्यमान आमदाराच्या माफियाराज ला प्रत्येक पेडणेकर कंटाळलेला आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात खदखद आहे, त्यामुळेच आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतला व विजय सरदेसाई यांची एकुणच कार्यपद्धती आवडल्यामुळे फॉरवर्डमध्ये आलो, असे मत प्रशांत गडेकर यांनी व्यक्त केले. पेडणेच्या आमदाराला यंदा आम्ही त्यांची जागा दाखवणार, असेही गडेकर म्हणाले.