प्रतिनिधी/ पणजी
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला एकाकी पाडण्यासाठी अन्य सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली असून केवळ आप वगळता अन्य सर्व पक्ष युतीच्या मुडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवायचेच असेल तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याबद्दल सर्वांचे एकमत झाले आहे. त्यातून भाजपचे कट्टर दुश्मन असलेल्या गोवा फॉरवर्डने तर सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून ’टीम गोवा’ बनविण्याची योजना आखली आहे. दुसऱया बाजूने प्रारंभी ’एकला चलो’ च्या मुडमध्ये असलेल्या भाजपने आता युतीचाही पर्याय खुला ठेवला आहे. या एकूण बदलत्या राजकीय समिकरणात आपण एकाकी पडू अशी भीती अपक्षांनाही सतावू लागली असून तेही एखाद्या पक्षाच्या छायेखाली येण्याच्या मनस्थितीत पोहोचले आहेत.
बदलत्या परिस्थितीत काँग्रेसला गोव्यातील मतदारांचा प्रतिसाद आहे. परंतु पक्षातील अंतर्गत भांडणे व लाथाळ्यांमुळे काँग्रेसचे भवितव्य जटील बनले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार असून त्याकामी पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांची कसोटी लागणार आहे. गोव्यातील चार दिवसांच्या वास्तव्यात अनेक नेते, कार्यकर्ते यांच्याशी विचारमंथन केल्यानंतर रविवारी ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
अध्यक्षपदी गिरीश चोडणकरच राहणार की नव्या नेतृत्वाकडे ते पद देणार हा प्रश्नही लाखमोलाचा ठरला असून त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या चोडणकर यांचे समर्थक आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांच्या विरोधात अनेक तक्रारी दिनेश गुंडूराव यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातून चोडणकर यांना हटवायचे झाल्यास नवीन अध्यक्षाचे पक्षकार्य, लोकसंपर्क, निर्णयक्षमता या सर्व बाबी तपासून पाहाव्या लागणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष बदलासंबंधी गुंडूराव यांना विचारले असता त्यासंदर्भात अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचे म्हणणे आपण ऐकून घेतले असून त्यांची मते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार, असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
फार वर्षांपासून काँग्रेसने एक तत्व पाळले आहे ते म्हणजे विधीमंडळ नेता आणि अध्यक्ष यातील कोणतेही एक पद हिंदूकडे आणि दुसरे पद ख्रिस्ती व्यक्तीकडे देण्यात येते. त्यामुळे विधीमंडळ नेतेपदी दिगंबर कामत कायम राहिल्यास अध्यक्षपद लुईझीन फालेरो किंवा फ्रान्सिस सार्दिन यांपैकी एकाकडे देण्यात येईल अशी चिन्हे आहेत. परंतु सार्दिन यांची थकलेली तब्येत आणि सध्याचे कार्य पाहता ते पद त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फालेरो यांच्याकडेच झुकते माप असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी प्रदेश अध्यक्षपदाच्या शर्यतीत वरील दोघांसह दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, ऍड. रमाकांत खलप यांचीही नावे चर्चेत होती.
दरम्यान, निवडणुकीसाठी आघाडी घडवायचीच झाल्यास गोवा फॉरवर्डला बरोबर घ्या, असा सल्ला अनेक नेत्यांनी काँग्रेसला दिला आहे. त्यादृष्टीने फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी चर्चाही झाल्याचे वृत्त आहे. त्यावरून तरी आघाडी जवळजवळ निश्चितच असली तरी त्यात आणखी किती व कोणत्या पक्षांचा समावेश होतो किंवा होत नाही ते लवकरच स्पष्ट होणार आहे. आघाडीच्या माध्यमातून किमान 22 ते 25 मतदारसंघात विजय प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
भाजप ’एकला चलो’च्या मूडमध्ये, युतीचाही पर्याय
काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्ली नेतृत्वावर अवलंबून असले तरी 27 आमदारांच्या बळावर भाजप मात्र सध्यातरी ’एकला चलो’च्याच मूडमध्ये आहे. प्रसंगी युतीसाठी प्रयत्न करण्याचा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. अपक्ष आमदार पक्ष शोधत आहेत तर युतीची चर्चा असली तरीही विरोधक एकत्र नाहीत, अशी सध्याची राज्यातील राजकीय स्थिती आहे.
तयारी युतीची, प्रतीक्षा ’ऑफर’ची!
तसे पाहता केवळ आम आदमी पक्ष वगळता मगोसह अन्य सर्वच पक्ष भाजपविरोधात युतीची भाषा बोलत आहेत. त्यादृष्टीने आकडय़ांची गणीतेही मांडत आहेत. परंतु प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती पलिकडून ’ऑफर’ मिळण्याची. प्रस्ताव येण्याची. त्याद्वारे प्रत्येकजण एकदुसऱयाची ’बार्गेनिंग पॉवर’ तपासत आहेत.
भाजप, काँग्रेसला गोव्यात थारा देऊ नका ः सुदिन
याप्रश्नी मगोचे सुदिन ढवळीकर यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि भाजपशी सोयरीक नको आहे. स्थानिक पक्षांशी सूत जुळवण्यावर त्यांचा भर आहे. असे पक्ष युतीसाठी तयार होतील व प्रस्ताव येतील याबद्दल ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजप व काँग्रेस यांना मतदारांनी गोव्यात थाराच देऊ नये. गोव्याची दारे त्यांच्यासाठी बंद करावी, असे आवाहनही ढवळीकर यांनी केले आहे.
समविचारी पक्षांनी एकत्र यावे ः जुझे फिलीप
समोरच्याला कधीच दुर्बल समजू नये. तोच नियम एखाद्या राजकीय पक्षालाही लागू होतो. प्रत्येक पक्षाचे आपले हक्काचे मतदार असतात. त्यामुळे एखाद्या पक्षाकडे मतदारच नाहीत, अशा गैरसमजात कुणीही राहू नये. भाजपला हरवायचेच असेल तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत जुझे फिलीप डिसोझा यांनी व्यक्त केले.
गोवा फॉरवर्डची ’टीम गोवा’ ची योजना
गोवा फॉरवर्डचे ’टीम गोवा’ घडविण्याचे स्वप्न आहे. त्याद्वारे गोंयकारवादी सर्व शक्तींना एकत्र करून भाजपला गोव्यातून हद्दपार करण्याची योजना आहे. 2022 मध्ये भाजप सत्तेत राहू नये यासाठी सर्व पक्षांना एक करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. त्यासंदर्भात पहिला प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे तो काँग्रेस पक्षासमोर. काँग्रेस सध्या स्वतःचीच विविध स्तरांवर फेरबांधणीच्या प्रक्रियेत आहे. परंतु भाजपला अन्य पक्षात फूट घालून 2022 च्या निवडणुकीत सत्तेवर येण्याची संधी मिळू नये यासाठी शक्य तेवढय़ा लवकर ’टीम गोवा’ स्थापन होणे आवश्यक आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.