गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव गोव्यात दाखल : मडगावात विविध समित्यांबरोबर बैठका
प्रतिनिधी /मडगाव
विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने काँग्रेस पक्ष सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागला असून गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव हे काल गुरुवारी गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यात आल्यावर त्यांनी पक्षाच्या विविध विभागांकडे चर्चा केली व आगामी काळात भाजपला कसे रोखावे, यावर मोर्चेबांधणी केली.
दिनेश गुंडूराव हे काल दाभोळी विमानतळावर आपल्या सोशल मिडिया, प्रिंट मिडिया तसेच इतर विभागातील प्रमुखांना घेऊन दाखल झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, दक्षिण व उत्तर गोवा अध्यक्ष ज्यो डायस व विजय भिके, जनार्दन भंडारी, संकल्प आमोणकर इत्यादींनी त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री सर्व क्षेत्रात अपयशी
दाबोळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिनेश गुंडूराव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्व क्षेत्रात अपयशी ठरल्याची जोरदार टीका केली. कोविडच्या काळात लोकांना चांगली सेवा देणे आवश्यक होते. त्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. कोविडमुळे अनेकांचे बळी गेले. त्याला देखील सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
पक्ष नेतृत्वात बदल करण्यासंदर्भात बोलताना गुंडूराव म्हणाले की, आपण पक्षातील सर्व घटकांशी चर्चा करणार आहे. गोव्यातील सर्व मतदारसंघांना देखील भेटी देण्याचा आपला प्रयत्न असेल व त्याचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना पाठविण्यात येईल व पक्ष श्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेतील.
मडगावात विविध घटकांशी चर्चा
मडगावच्या हॉटेल मेजिस्टीकमध्ये त्यांनी युवा काँग्रेस, महिला काँग्रेस, पक्षाचा सोशल मिडिया व प्रिंट मिडिया विभाग, एनएसयूआय, मतदारसंघाच्या गट समित्या यांच्याकडे चर्चा केली. आगामी सहा महिन्यात निवडणूक होत असल्याने सर्वांनी आपआपली जबाबदारी ओळखून पक्षासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवा काँग्रेसने कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजन पुरवठा तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात भर दिल्याने दिनेश गुंडूराव यांनी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचे खास अभिनंदन केले.
प्रदेश अध्यक्षपदात बदल नको : संकल्प
प्रदेश अध्यक्षपदात आत्ता कोणताच बदल करू नये अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली आहे. निवडणुकीला जमतेम सहा महिन्याचा कालावधी बाकी असून प्रदेश अध्यक्षपदात बदल करणे योग्य ठरणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गिरीश चोडणकर यांनी आजवर पक्षासाठी प्रामाणिक काम केले केल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदात कोणताच बदल न करण्यावर ठाम
उपलब्ध माहिती प्रमाणे प्रदेश अध्यक्षपदात कोणताच बदल करायचा नाही, याबाबत काँग्रेस पक्षातील एक गट ठाम आहे. आज जे कोणी पक्ष नेतृत्वात बदल करावे अशी मागणी करतात ते कुठे होते? आता निवडणुका जवळ आल्याने ते जागृत झालेले आहेत व अध्यक्षपदात बदल करावा अशी मागणी करीत आहे. पण, पक्ष आत्ता अध्यक्षपदात बदल करणार नाही हे ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्षपदात बदल न करता उत्तर व दक्षिण गोव्यासाठी कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. हे कार्यकारी अध्यक्ष हे युवा कार्यकर्त्यांपैकी असतील, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
बैठकीला आमंत्रित न केल्याने वाद
मडगावातील उस्मान नामक कार्यकर्त्यांने हॉटेल मेजिस्टीकमध्ये सुरू असलेल्या बैठकीला आपल्याला आमंत्रित न केल्याचे कारण पुढे करून वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वेळीच रोखण्यात आले. आपण पक्षाचा कार्यकर्ता असताना देखील आपल्याला आमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.