तारीख जाहीर केल्यानंतर काही तासातच लांबणीवर टाकला निवडणुकीचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक लांबणीवर टाकण्यामागे कोरोना संसर्गाचे निमित्त पुढे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पक्षाच्या बैठकीअंती 23 जूनला निवडणूक होईल, असे जाहीर करण्यात आले होते. तसेच 7 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले होते. पण ही निवडणूक कोरोनाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला. आता पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद राहणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले होते.
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी घराण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटळ झाल्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्मयता मावळली आहे. काँग्रेसला गांधी घराण्याऐवजी नवे नेतृत्व मिळाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान मिळू शकते, असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. त्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बैठकांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. यानंतरही विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशाच पडल्यामुळे पक्षाला आता पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. पण आता पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर पडली आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेणे उचित ठरणार नाही, असा निर्णय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.