विधान परिषदेचे राजद उमेदवार निश्चित
वृत्तसंस्था/ पाटणा
महाआघाडीतील घटक पक्षांना फारसे महत्त्व न देण्याचा निर्णय बहुधा राजद नेते तेजस्वी यादव यांनी घेतला असावा. बिहारमध्ये विधान परिषदेच्या 24 जागांवर होणाऱया निवडणुकीसाठी राजदने महाआघाडीतील घटक पक्षांच्या मागण्यांना धुडकावत स्वतःच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. अलिकडेच कुशेश्वरस्थान आणि तारापूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणेच राजदने काँग्रेसच्या मागण्यांना नाकारून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत.
या उमेदवारांच्या यादीवर आता केवळ राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याकडून मोहोर उमटणे शिल्लक आहे. तेजस्वी यांनी वरिष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांच्याकडून करण्यात आलेल्या 6 जागांच्या मागणीलाही धुडकावून लावले आहे. लालू यादवांनी हमी दर्शविल्यावर उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
बिहार विधान परिषदेची निवडणूक पाहता तेजप्रताप यांनी स्वतःच्या समर्थकांसाठी 6 जागांची मागणी केली आहे. राजदने विधान परिषदेच्या 6 जागा छात्र जनशक्ती परिषदेला न दिल्यास पुढील निर्णय घेतला जाई. श्रीकृष्ण रुपी तेजप्रताप यादव यांच्याशिवाय विजय अशक्य असल्याचे राजदने समजून घ्यावे. दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत याचा पुरावा मिळाला असल्याचे तेजप्रताप यादव यांचे निकटवर्तीय प्रशांत यादव यांनी म्हटले आहे.