वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उत्तर काशी जिल्हय़ातील पुरोला मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजकुमार यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात राजकुमार यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
उत्तराखंडमध्ये सुमारे 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष प्रभावशाली नेत्यांना स्वतःसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्यस्थितीत भाजप याप्रकरणी आघाडीवर आहे. अलिकडेच धनोल्टी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रीतम सिंह पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
याचबरोबर आणखीन काही आमदार भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. राजकुमार यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या एकूण आमदारांची संख्या आता 57 वर पोहोचली आहे. गंगोत्रीचे आमदार गोपाल सिंह रावत यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून तेथे पोटनिवडणूक झालेली नाही. पुरोलाचे आमदार राजकुमार हे पूर्वी भाजपमध्येच होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.