अनेकांच्या भुवया उंचावल्या, शंकाकुशंकाना वाव
प्रतिनिधी /पणजी
कुंभारजुवे मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजेश फळदेसाई हे लाल बुधवारी भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना शुभेच्छा देण्यासाठी थेट भाजप कार्यालयात पोचले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. फळदेसाई हे भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना, असा प्रश्न अनेकांनी व्यक्त केला.
राजेश फळदेसाई हे डॉ. प्रमोद सांवत यांचे समर्थक आणि उपसभापती सुभाष फळदेसाई यांचे ते नातेवाईक आहेत. पुंभारजुवेच्या भाजप उमेदवारीबाबत भाजपने कोणतेही स्पष्ट आश्वासन दिले नाही त्यामुळे ते काँगेसमध्ये गेले. काँग्रेसमधून ते विजयी झाले. मात्र पक्ष काही सत्तेवर आला नसल्याने त्यांच्या पदरी थोडी निराशा आली. यावर उतारा म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी फळदेसाई यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. याच दरम्यान बुधवारी भाजपने आयोजित केलेल्या स्थापना दिन समारंभाला शुभेच्छा देण्यासाठी फळदेसाई थेट भाजप कार्यालयात पोचले आणि उपस्थितांना धक्काच बसला.
मायकल लोबेंसोबत चर्चा
दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी राजेश फळदेसाई यांना चर्चेसाठी बोलावल्याचे वृत्त आहे. फळदेसाई हे राजकारणात नव्यानेच प्रवेशकर्ते झाले असून कुणीही कितीही आश्वासने दिली तरी पक्षशिस्त आणि मतदारांनी निवडून दिलेल्या मतांची कदर महत्त्वाची आहे, हे लोबो यांनी त्यांना पटवून दिल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात सुमारे तासभर चर्चा झाली.
काँगेसचे वरिष्ठ नेते आणि गोवा विभागाचे प्रमुख असलेले दिनेश गुंडुराव हे 10 एप्रिल रोजी गोव्यात येत आहेत. आपल्या गोवा दौऱयात ते काँग्रेसच्या सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत.