अजय रायविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
उत्तरप्रदेशच्या वाराणसीमधील पिंडरा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्यावर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात भाग घेण्याप्रकरणी 24 तासांची बंदी घातली आहे. पिंडराचे उपजिल्हाधिकारी तसेच निवडणूक अधिकारी राजीव राय यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत अजय राय यांना सोपविली आहे.
या आदेशानुसार राय यांच्यावर 26 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून पुढील 24 तासांपर्यंत कुठल्याही प्रकारची जाहीर सभा, रॅली, रोड शो करणे किंवा मुलाखत देण्यास बंदी असणार आहे. एका जाहीर सभेत काँग्रेस उमेदवाराने कथितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात फूलपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता.
निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारी रोजी राय यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते आणि राय यांनी स्वतःची बाजू मांडली होती. आयोगाने राय यांच्या टिप्पणीला गंभीर मानत निवडणूक प्रचारात भाग घेण्यास 24 तासांसाठी बंदी घातली आहे.