पेगॅसस हेरगिरी, महागाई, रोजगाराच्या मुद्दय़ावर आंदोलन : संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळसत्र सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेगॅसस हेरगिरी घोटाळा आणि महागाईच्या मुद्यावर युवक काँग्रेसने गुरुवारी संसदेबाहेर निदर्शने केली. संसदेला घेराव घालण्यासाठी हजारो काँग्रेस कार्यकर्ते एकवटले होते. या आंदोलनादरम्यान निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या माऱयाचा वापर केला. याप्रसंगी राहुल गांधीदेखील निदर्शनात सहभागी झाले होते. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी देशभरातून कार्यकर्ते दिल्लीला पोहोचले होते.
पंतप्रधान मोदी रोजगाराच्या मुद्यावर एक शब्दही बोलत नाहीत. गेल्या 7 वर्षात 12 कोटी युवक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पंतप्रधानांनी त्यांना नोकऱयांचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी करोडो तरुणांच्या नोकऱया हिरावून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रोजगाराच्या मुद्दय़ाबरोबरच पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणीही विरोधकांनी केली.
संसदेत गदारोळ सुरूच
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱया आठवडय़ाचा गुरुवारी चौथा दिवस होता. यावेळी दोन्ही सदनांमध्ये पेगॅसस हेरगिरी घोटाळा आणि नवीन कृषी कायद्यांवरून विरोधकांनी सरकारवर हल्ला केला. या मुद्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. याचदरम्यान केंद्र सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहे, मात्र विरोधकांचा गदारोळ थांबत नसल्यामुळे चर्चा होत नसल्याचा दावा भाजपने केला आहे.
लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाले. मात्र, गोंधळ झाल्यानंतर सभागृह दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज दुपारी 4 आणि नंतर संध्याकाळी 5 पर्यंत तहकूब करावे लागले. तसेच राज्यसभेतही गदारोळातच कामकाज सुरुवात झाले. विरोधकांच्या गदारोळामुळे सुरुवातीला सभागृह 11.30 पर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज दुपारी 2 पर्यंत आणि नंतर 3.40 पर्यंत तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन
राज्यसभेत गदारोळादरम्यान संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर करण्यात आले. तसेच भारतीय हॉकी संघाचे दोन्ही सभागृहात ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नमूद केले.