बेंगळूर / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात काही कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने धाड घातली आहे. या कंपन्यांचे अनेक गुप्त व्यवहार आणि कोटय़वधी रुपयांच्या बेहिशेबी गुंतवणुकीत या धाडीमुळे उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांनाच काँग्रेसच्या प्रचाराची कंत्राटेही दिली गेली होती. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या धाडीसंबंधी प्राप्तिकर विभागाने वक्तव्य प्रसिद्धीस दिले आहे. देशात सुरत, बेंगळूर, चंदिगढ आणि मोहाली येथे कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात हिझाईन-बॉक्सड् क्रिएटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कर्नाटक प्रदेश काँगेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षासाठी प्रचार धोरण सल्ला देण्याचे कंत्राट दिले होते असे आता उघडकीस येत आहे.
या कंपनीच्या एंट्री ऑपरेटरने हवाला रॅकेटमधून 7 कोटी रुपयांची बेहिशेबी गुंतवणूक केल्याची कबुली दिली आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले. तसेच खर्चात बनावट वाढ दाखवून उत्पन्नात कृत्रीम कपात दाखविण्याची युक्तीही कर चुकविण्यासाठी योजण्यात आलेली होती. यातून निर्माण झालेला काळा पैसा इतरत्र गुंतविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या कंपन्यांचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय उपयोग करत असलेल्या महागडय़ा कार्स कंपन्यांच्या कर्मचाऱयांच्या नावाने खरेदी करण्यात आल्याचेही आढळले आहे.
कचरा व्यवस्थापनाचे नाव
काही कंपन्या भारतात अनेक स्थानी कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे आणि भंगार व्यवस्थापन करणे असे व्यवसाय करीत असल्याचे दाखवित आहेत. त्यांनी या संबंधी भारतातील काही शहरांच्या महानगरपालिकांची कंत्राटेही मिळविली आहेत. कचरा व्यवस्थापनाच्या व्यवहारातही खर्च जास्त दाखवून 70 कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण केल्याचा भक्कम पुरावा प्राप्तिकर विभागाला मिळाल्याचे वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले. धाडींमध्ये 1 कोटी 95 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि 65 लाख रुपयांची आभूषणे हस्तगत झाली आहेत.