मुंबई/प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
गायकवाड यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २० दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी १० वाजता त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते.
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.