वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. तीव्र ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्याने नजर ठेवून आहेत.
ताप येत असल्याने तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कमलनाथ यांचा आगामी कार्यक्रम ठरणार असल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले आहे.
तीन महिन्यांपूर्वी देखील कमलनाथ यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हाही त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे 10 दिवस उपचार घेतल्यावर ते घरी परतले होते.