प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत्या बुधवार 2 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत असून त्यादिवशी ते सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील बोडके मैदानात ऑनलाईन पद्धतीने जाहीर सभा व ‘निर्धार’ मेळावा घेणार आहेत.
तेथूनच ते काँग्रेसच्या गोवा फॉरवर्डच्या सर्व उमेदवारांशी तसेच गोमंतकीय जनतेशी संवाद साधून चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचा जाहीरनामाही प्रकाशित करतील. काही मतदारसंघात घरोघरी जाऊन ते प्रचारातही भाग घेणार आहेत. त्यांच्याशी संवाद करण्यासाठी 40 मतदारसंघात डिजिटल स्क्रीनची व्यवस्था होणार असून तेथून उमेदवार, काँग्रेस, गोवा फॉरवर्डचे नेते व जनता यांच्याशी थेट ऑनलाईन संवाद करतील. काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी वरील माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, वरि÷ उपाध्यक्ष एम. के. शेख, विठू मोरजकर, हिमांशू तिवरेकर, समीर रायकर आदी उपस्थित होते.
गोव्याला बदल हवा आहे, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ते पर्यटन उद्योगातील प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटतील. संध्याकाळी 4 वाजता ते साखळी येथे सभेला संबोधित करतील. सभेत गोव्यातील काँग्रेस समर्थक व्हरर्च्युअल माध्यमातून सहभाग घेणार आहेत. राहुल गांधी सर्व उमेदवारांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. मला आशा आहे की गोव्यातील जनता काँग्रेसला बहुमत देऊन स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी साथ देईल, असेही त्या म्हणाल्या.
गिरीश चोडणकर म्हणाले की, आम्ही प्रचार करतो तेव्हा हे दिसून येते की गोव्यातील लोकांना बदल हवा आहे. त्यांनी भाजपला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण भाजपने गोव्याच्या विकासाला बाधा आणली आहे आणि थ्री लिनियर प्रकल्प आणून पर्यावरणाचा ऱहास केला आहे. असंवेदनशील भाजप सरकारमुळे त्रस्त असलेल्या समाजातील सर्व घटकांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. राहुल गांधी काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिद्ध करणार आहेत.