प्रतिनिधी/ मडगाव
काँग्रेस पक्ष हा विशाल महासागर आहे. काँग्रेस पक्षात कोणीही प्रवेश करू शकतात. काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षांतील कार्यकर्ते व नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. आगामी काळात देखील आणखीन काही जण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. मात्र, पक्षात प्रवेश करणाऱयांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी आग्रह धरू नये, अशा सूचक प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.
वेळळीचे आमदार बेंजामिन सिल्वा यांना शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने वेळळी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱयांच्या संदर्भातील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हल्लीच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर यांच्या भाऊना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी सांगेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी वेळळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांना प्रवेश दिल्यानंतर वेळळीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, काँग्रेसच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लवकरच आम आदमी पक्षाचे माजी गोवा प्रमुख एल्विस गोम्स हेसुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे कुंकळळीतील काँग्रेसचे कार्यकर्ते व युवा नेते युरी आलेमाव कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे ः खासदार फ्रान्सिस सार्दिन
काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहे. ही पक्षासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. गोव्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. त्यामुळेच इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते आज काँग्रेसकडे आकर्षित होत आहे. काँग्रेस पक्षासाठी ही नक्कीच जमेची बाजू आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱयांनी उमेदवारीसाठी आग्रह करू नये, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी दक्षिण गोवा काँग्रेसच्या कार्यालयात जो काही प्रकार घडला तो दुर्दैवी होता. अन्य पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देताना स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. जेणेकरून शुक्रवारी जी घटना घडली तशी घटना घडली नसती. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे, असे खासदार सार्दिन म्हणाले.
केंद्रीय नेत्यांच्या आदेशानुसार पक्ष प्रवेश ः ज्यो डायस
काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱयांना पक्षात प्रवेश दिला पाहिजे, असा स्पष्ट आदेश केंद्रीय नेत्यांनी दिलेला आहे. त्यानुसार प्रवेश दिला जात आहे. अशावेळी त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध करू नये. या क्षणी पक्ष मजबूत होणे ही अत्यंत आवश्यक बाब बनलेली आहे. पक्ष कुणाच्याही दडपणाखाली येणार नाही. पक्षात प्रवेश करणाऱयांनी अगोदर पक्षासाठी कार्य करणे आवश्यक आहे. त्यांचे कार्य व निवडणूक जिंकण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट मत दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांनी व्यक्त केले.
आपण स्वतः वेळळी मतदारसंघात उमेदवारीसाठीचा दावेदार आहे. परंतु, बेंजामिन डिसिल्वा यांनी प्रवेश केला म्हणून आपण नाराज झालेलो नाही. बेंजामिन डिसिल्वा यांना उमेदवारी देण्याचे कोणतेच आश्वासन पक्षाने दिलेले नाही, असे ज्यो डायस म्हणाले.
पक्ष मजबूत होत असल्याचे संकेत ः दिगंबर कामत
माजी आमदार बेंजामिन डिसिल्वा किंवा अन्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे हे चांगले संकेत आहेत. काँग्रेस पक्ष मजबूत होत असल्याचे ते स्पष्ट संकेत आहेत. राज्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली असल्याने इतर पक्षातील नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतात, त्यांचे पक्षात स्वागत आहेच. इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. पक्षाची वाढ होणे व पक्ष मजबूत होणे महत्त्वाचे असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही ः गिरीश चोडणकर
काँग्रेस पक्षाने बरेच आघात सहन केलेले आहेत. आता यापुढे काँग्रेस पक्षात कोणताच बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने पुढे जात आहे. त्याला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देणे हा पक्षाच्या धोरणाचाच एक भाग आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात आहे. अशावेळी कोणताच बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.