गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांची प्रतिक्रिया : सांत आंद्रे, काणकोणात काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने निराशा
प्रतिनिधी /मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी सांत आंदे आणि काणकोणच्या जागा काँग्रेस उमेदवारांसाठी राखून ठेवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. काँग्रेसने त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहावे अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाने दावा केलेल्या जाग्यांवर आता काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले असल्याचे सांगितले. गोवा फॉरवर्डने त्यांचा प्रभाव असलेले मतदारसंघच मागितले होते, असे ते म्हणाले.
सांत आंदे आणि काणकोण हे दोन मतदारसंघ आहेत जिथे आमच्या उमेदवारांनी काम केले आहे. आमचे एकमेव उद्दिष्ट भाजपला पराभूत करणे आहे आणि आम्ही फक्त त्या जागांवर दावा केला आहे जिथे आम्ही भाजपला हरवू शकतो, असे प्रभुदेसाई म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी जाहीर केली. काँग्रेस हा युतीतील राष्ट्रीय आणि प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे आघाडीच्या जागा त्यांच्या वाटय़ालाही गेल्या पाहिजेत. तथापि, आमच्या मागण्या खूप कमी होत्या, असे ते म्हणाले.
युतीच्या जागावाटपाबद्दल संयुक्त बैठकीमध्ये त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांशी सल्लामसलत करून स्पष्ट सहमत व्यक्त केले होते. काही निकष पूर्ण करणाऱया उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाईल असे मान्य करण्यात आले होते, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहण्याची अपेक्षा करत प्रभुदेसाई म्हणाले की, युती गोव्याच्या बाहेरील राष्ट्रीय आणि पक्षाच्या नेत्यांचा हस्तक्षेप होणार नाही या करारावर आधारित आहे. आम्ही स्थानिक भावना आणि हित लक्षात ठेवण्याचे ध्येय ठेवतो. म्हादईसारखे प्रश्न गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठी निकाली काढण्याचे निश्चित करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस – गोवा फॉरवर्ड हातात हात घालून जाऊ शकतात
सामायिक कार्यक्रम, परस्परांबद्दल आदर आणि वचनबद्धतेबद्दल निष्ठा ही गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसने केलेल्या युतीची आवश्यकता आहे. पक्षाने सच्चे राहावे आणि दिलेल्या वचनाचे पालन करावे. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड हे दोघेही भाजपचा सर्वसमावेशकपणे पराभव करण्यासाठी हातात हात घालून जाऊ शकतात, असे प्रभुदेसाई म्हणाले. सावंत सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. काँग्रेस एका वचनबद्धतेपासून मागे हटली आहे. पण आम्ही गोव्याच्या हितासाठी काम करत असल्याने लगेच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. काँग्रेसने कृती करावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही फक्त प्रतीक्षा करू आणि त्यांच्या कृती पाहू आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. काँग्रेसने फातोर्डा आणि मये हे मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडले आहेत. आता गोवा फॉरवर्डला मांदेची अपेक्षा आहे.