मंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
वार्ताहर/ मडकई
गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर व माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी सन् 1963 ते 1979 पर्यंत सर्व क्षेत्रे हाताळून गोव्याची यशस्वीरीत्या बांधणी करून धरणीपुत्रांना न्याय मिळवून दिला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानामुळेच गरिबवर्ग शिकू शकला. कुळ-मुंडकार यांच्यासाठी खास कायदा बनवून त्यांना हक्काची घरे मिळवून दिली मात्र मगोच्या कार्यकाळानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस व भाजपाने आमदार पळविण्याचेच राजकारण केले. सत्तेसाठी हपापलेल्या या काँगेस व भाजपाला यापुढे गोव्याच्या राजकारणातून हद्दपार करा, असे आवाहन मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्व. भाऊसाहेब बांदोडकर जयंती सोहळय़ात केले.
फर्मागुडी येथील भाऊसाहेबांच्या अर्धपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी आदरांजली वाहिली. मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर, केंद्रीय समितीचे सचिव प्रताप फडते, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, वेलिंग प्रियोळचे दामोदर नाईक, बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, फोंडा मतदारसंघाचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर, केंद्रीय समितीचे अनंत नाईक, महेश पणशीकर, कृष्णनाथ दिवकर, दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक, बांदोडाच्या उपसरपंच सलोनी गावडे, मडकईच्या सरपंच लक्ष्मी तारी वळवईकर, पंचसदस्य विशांत नाईक, शैलेंद्र पणजीकर, वेलिंग प्रियोळचे पांडुरंग गावडे, वाडी तळावलीचे पंचसदस्य हर्षल तळावलीकर, दुर्भाटचे पंचसदस्य राजेश नाईक, बांदोडा उपसरपंच सलोनी गावडे, कवळेच्या उपसरपंच मनुजा नाईक, माजी जिल्हा सदस्य शिवदास गावडे तसेच फोंडा तालुक्यातील आजी-माजी पंचसदस्य व मगो कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मराठी प्राथमिक शाळांची स्थापना भाऊंनी केल्यानंतर त्याची कार्यवाही ताईंनी केली मात्र त्यानंतर भाजपाने ंया शाळा बंद कशा पडतील, यावरच अधिक भर दिलेला आहे. म्हणूनच ही प्राथमिक विद्यालये बंद पडलेली आहे. या विद्यालयांच्या समस्यांकडे मगो पक्ष लक्ष देऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करील, असे आश्वासन मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी याप्रसंगी दिले. कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात भाऊसाहेबांनी भरीव योगदान दिले. त्यांनी राबविलेली पक्षांची ध्येय धोरणे व नैतिक मूल्ये घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असेही सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले.