प्रतिनिधी/ पणजी
शुक्रवारी गोवा महिला प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांना पोलिस निरीक्षक सागर एकोसकर यांना बडतर्फ करावी अशा मागणीचे निवेदन देण्यास गेल्या असता पोलिस आणि महिला शिष्टमंडळाच्या यांच्यामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले. दरम्यान पोलिस आणि शिष्टमंडळांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत शिष्टमंडळाच्या महिलांसह काही पोलिस महिला देखील किरकोळ जखमी झाल्या.
या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. सुमारे अर्ध्यातासापेक्षा जास्त चाललेल्या या नाटय़मय घटनेत शिष्टमंडळातर्फे सरकाराविरोधात नारे दिले. तसेच अनेकदा या शिष्टमंडळाने पोलिसांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटण्यास मनाई केल्याने जुनता हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे ठाण मांडून बसल्या. यानंतर काहीच उपाय नसल्याने पोलिसांनी महिला आयोगाच्या अध्यक्षाला भेटण्याची परवानगी दिली.
सरकार हे हुकुमशाही करत आहे. यांना लोकांचे काहीच पडलेले नाही. मेळावलीमध्ये जो काही प्रकार पोलिस निरीक्षक सागर एकोसकर याने तिथल्या महिलासोबत केला ते कृत्य निंदणीय असून सागर एकोसकर यांना निलंबीत न करता बडतर्फ करावे अशा मागणीचे निवेदन प्रतिमा कुतिन्हो यांनी यावेळी विद्या गावडे यांना दिले.
गोवा महिला प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ यांनी जे निवेदन महिला आयोगाला दिले आहे यावर आम्ही पूर्ण अभ्यास करुन या घटनेचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करणार आहोत. अशी ग्वाही महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे यांनी यावेळी दिले. तसेच पोलिस आणि या शिष्टमंडळाच्या झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकाराचे आपल्याला काहीच माहीत नसल्याचे गावडे यांनी यावेळी सांगितले त्याचप्रमाणे या शिष्टमंडळाने आपल्याला भेटण्याची रीतसर परवानगी घेतली होती असे गावडे यांनी स्पष्ट केले.