ऑनलाईन टीम / मुंबई :
स्व. खासदार राजीव सातव यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. प्रज्ञा यांना काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूमुळे रिक्त असलेल्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने यासंर्भात वृत्त दिले आहे.
रणपिसे यांच्या रिक्त जागेसाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे इच्छूक होते. मात्र, या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नीला संधी देण्याचा मतप्रवाह पक्षात होता. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्याचे पक्षाने जवळपास निश्चित केले आहे. विधानपरिषदेच्या या जागेसाठी 29 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नाव्हेंबर आहे. रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदाराला मिळणार आहे.