उत्तराखंडच्या दौऱयावर प्रियंका वड्रा: काँग्रेसचे घोषणापत्र सादर
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि स्टार प्रचारक प्रियंका वड्रा यांनी उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपयांपेक्षा अधिक होणार नसल्याचे आश्वासन बुधवारी दिले आहे. महागाई कमी करण्यासाठी विशेष कार्ययोजना तयार करून पावले उचलली जाततील. भाजपने विकासाच्या नावावर काहीच केलेले नाही. भाजपने काम करण्याऐवजी जाहिरातबाजी केली. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढीसह भाजपचे डबल इंजिन ठप्प पडल्याची टीका त्यांनी केली आहे.
बुधवारी देहरादून येथे पोहोचलेल्या प्रियंका वड्रा यांनी काँग्रेसचे घोषणापत्र ‘उत्तराखंडी स्वाभिमान प्रतिज्ञापत्र’ जारी केले. उत्तराखंडच्या सर्व 70 मतदारसंघांना व्हर्च्युअल सभेद्वारे संबोधित करताना प्रियंका यांनी भाजप सरकारच्या काळात घरगुती सिलिंडरचे दर 1 हजार रुपयांच्या पलिकडे पोहोचले असून पर्वतीय क्षेत्रात पोहोचेपर्यंत याच्या किमती 2 हजारांपर्यंत जात असल्याचा आरोप केला. काँग्रेस राज्यात सत्तेवर आल्यास कुठल्याही स्थितीत सिलिंडरची किंमत 500 रुपयांहून अधिक होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
स्वस्त घरगुती साधने मिळणे हा प्रत्येक गृहिणीचा हक्क असून तिला तो कुठल्याही स्थितीत मिळवून दिला जाईल. भाजपकडून विकासाच्या नावावर उत्तराखंडमध्ये केवळ बोलले गेले, उत्तराखंडच्या पर्वतीय जिल्हय़ांमध्ये ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. बदल घडवून आणण्यासाठी जागरुकता आवश्यक असून योग्य पक्ष सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
घोषणापत्रातील ठळक मुद्दे
1 काँग्रेसचे सरकार येताच 4 लाख रिक्त पदे भरण्यास विशेष प्राधान्य
2 रोडवेज बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचा लाभ
3 शासकीय नोकऱयांमध्ये 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव
4 पर्यटनाला चालना देण्याचे धोरण तयार करून अंमलबजावणी
5 पोलीस विभागात महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव
6 पर्यटन पोलीस विभागाची स्थापन, स्थानिक लोकांना प्राथमिकता
7 आशा-अंगणवाडी सेविकांचे मानधन दीडपट वाढविणार
8 आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबाला वर्षाला 40 हजारांची मदत
9 आरोग्य सेवांवर विशेष लक्ष. ड्रोनद्वारे औषधे पोहोचविणार
10 फळे, भाज्या, डाळी तेलासह खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित करणार
11 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड
12 उत्तराखंडमध्ये लोकायुक्त व्यवस्था लागू होणार
13 अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीत ब्लॉक कॅडर व्यवस्था
14 मेरे बुजुर्ग-मेरी तीर्थ योजना सुरू केली जाणार
कुटुंबाला उत्तराखंडशी जोडले
प्रियंका वड्रा यांनी स्वतःच्या संबोधनाची सुरुवात केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोभीसह चारही धामांना नमन करून केली. माझे वडिल, काका, भावाने देहरादूनमधून शिक्षण घेतले आहे. माझ्या कुटुंबाचे उत्तराखंडशी अत्यंत जुने नाते आहे. मागील अनेक वर्षांपासून मी उत्तराखंडमध्ये येत आहे. परंतु मागील 5 वर्षांमध्ये उत्तराखंडमधील स्थिती पाहून अत्यंत दुःख होत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.