निवडणूक लांबणीवर टाकण्याची काँग्रेसची मागणी -भाजपकडून निजदला पाठिंबा
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस सदस्यांचे आंदोलन आणि निवडणुकीवरील बहिष्कारादरम्यान विधानपरिषदेच्या सभापतीपदी निजदचे उमेदवार बसवराज होरट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी प्रथमच सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी गदारोळ, सभात्यागाचा प्रसंग घडला आहे. काँग्रेस सदस्यांनी निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी करून सभात्याग केल्याने होरट्टी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
गोहत्या बंदीचे विधेयक कोणत्याही चर्चेविना घाईगडबडीत संमत करण्यात आल्याने मंगळवारी काँग्रेस सदस्यांनी विधानपरिषदेत सरकारच्या भूमिकेचे खंडन करून सभापतींच्या आसनासमोर धरणे आंदोलन छेडले. उपसभापती एम. के. प्राणेश यांनी सोमवारी गोहत्या बंदी विधेयकाबाबत घाईगडबडीत निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुलिंग द्यावे. रुलिंग मिळेपर्यंत सभापतीपदाची निवडणूक लांबणीवर टाकावी, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली.
दरम्यान, उपसभापती एम. के. प्राणेश यांनी सभापती निवडणुकीची प्रक्रिया हाती घेतली. त्यानंतर निजदचे सदस्य के. व्ही. नारायणस्वामी यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी बसवराज होरट्टी यांचे नाव सुचविले. त्यावर सदस्य के. टी. श्रीकंठेगौडा यांनी अनुमोदन दिले. काँग्रेसचे उमेदवार नजीर अहमद यांच्या वतीने कोणत्याही सदस्याने कोणताही प्रस्ताव किंवा अनुमोदन न दिल्याने बसवराज होरट्टी यांची सभापतीपदी सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
तत्पूर्वी काँग्रेस सदस्यांनी सभागृह योग्य मार्गावर नाही. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक लांबणीवर टाकावी, अशी मागणी केली. यावेळी निर्माण झालेल्या गदारोळातच सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया हाती घेऊन बसवराज होरट्टींची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे नेते कोटा श्रीनिवास पुजारी, मंत्री बसवराज बोम्माई, आर. अशोक व इतर सदस्यांनी होरट्टी यांना सभाध्यक्षांच्या आसनापर्यंत आणले. त्यावेळी होरट्टींनी सर्व सदस्यांना अभिवादन करून आसन ग्रहण केले. याप्रसंगी माजी सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्यासह अनेकांनी होरट्टींचे अभिनंदन केले. त्यानंतर अनेकांनी होरट्टींच्या राजकीय कारकिर्दीबद्दल गुणगाण केले.
सभागृहातील सदस्य बलाबल
एकूण 75 सदस्यसंख्या असणाऱया विधानपरिषदेत सभापती-उपसभापती निवडीसाठी 38 मते मिळणे आवश्यक आहे. मात्र, या सभागृहात कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे सभापतीपदासाठी भाजपने निजदला पाठिंबा दिला. भाजपकडे 31 तर निजदकडे 13 सदस्यबळ आहे. या दोन्ही पक्षांनी युती केल्यामुळे बसवराज होरट्टींची निवड जवळपास निश्चित होती. तर एकाकी असणाऱया काँग्रेसकडे 28 सदस्यबळ आणि एक अपक्ष सदस्य आहे. एक जागा रिक्त आहे.
बसवराज होरट्टींची राजकीय वाटचाल
कर्नाटक विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवडून आलेले ज्येष्ठ निजद नेते बसवराज होरट्टी चार दशकांपासून सक्रिय राजकारणात आहेत. एकाच मतदारसंघातून सलग 7 वेळा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कर्नाटकाच्या पश्चिम शिक्षक मतदारसंघातून 1980, 1986, 1992, 1998, 2004, 2010 आणि 2016 या सालातील निवडणुकीत ते विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. बागलकोट जिल्हय़ाच्या यडहळ्ळी गावात त्यांचा जन्म झाला. या गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. तर मुधोळ येथे माध्यमिक शिक्षण, हुबळी येथे पदवी शिक्षक, बेंगळूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. 1975 पासून 1980 पर्यंत हुबळीच्या लॅमिंग्टन माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली. शिक्षकांना सहन कराव्या लागणाऱया अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेची स्थापना केली. 1983, 1986 आणि 1989 मध्ये धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाचे सिनेट आणि चारवेळा सिंडीकेट सदस्य म्हणून ते निवडून आले होते. 1998 मध्ये राज्य क्रीडा मंडळाचे ते सदस्यही होते. 2004 मध्ये राज्यातील निजद-काँग्रेस युती सरकारच्या काळात होरट्टी यांनी विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामविकास-पंचायतराज मंत्री म्हणून काम केले. 2006 मध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात प्राथमिक-माध्यमिक शिक्षण आणि संसदीय कामकाज खात्याची धुरा सांभाळली होती. निजद-भाजप युती सरकारच्या काळात हंगामी सभापती म्हणूनही त्यांनी विधानपरिषदेचा कार्यभार सांभाळला होता.