अंकुश कोकरे / कास :
गुरुवारच्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील कादांटी खोऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या संदीप ढेबे यांच्या गाई, म्हैशी, बैल रेडे अशी एकूण 68 जनावरे ओढ्यात दरडीखाली दबून तर काही वाहून गेल्याने दगावली. घटनास्थळी अद्याप प्रशासन पोहचले नसून, पंचनामाही झालेला नाही. दरम्यान, या घटनेत जनावरांचे मालक ढेबे हे देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरूवारी मुसळधार पावसाने सर्व जिल्हा झोडपला. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटना घडल्या. दरम्यान, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील लामज मुरा गावचे रहिवाशी संदीप ढेबे हे गुरुवारी भावांचे व स्वतःचे पशुधन घेऊन वाघावळे गावच्या हद्दीत चारावयास गेले होते. जनावरे घेऊन सांयकाळी सहाच्या सुमारास घरी परतत असताना ओढ्याच्या ठिकाणी जनावरे येताच अचानक वरून मोठी दरड कोसळली व ओढयाला पुर आला. यामध्ये काही जनावरे दरडी खाली दबली तर काही पुराच्या पाण्यात वाहुन गेली. यामध्ये शेवटी असणारे संदीप ढेबेही मोठया प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठ्या पशुधनाची हानी होऊनही अद्याप घटनास्थळावर प्रशासन दाखल झाले नाही. कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही.