बेळगाव बाजारात बुधवारी 50 ट्रक कांदा आवक : क्लोजडाऊनमुळे सौदे शनिवारऐवजी सोमवारी
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, जवारी बटाटा आणि गूळ दरात 100 रुपये वाढ झाली आहे, तर परराज्यातील बटाटय़ाचे भाव स्थिर होते.
बाजारात 50 ट्रक कांदा आवक
बेळगाव बाजारात बुधवारी 50 ट्रक इतकी कांदा आवक होती. यामध्ये कर्नाटकमधून 20 ट्रक तर महाराष्ट्रातून 30 ट्रक इतकी कांदा आवक झाली होती. दोन्ही ठिकाणचा प्रत्येकी एक ट्रक कांदा सफेद होता. यामध्ये 30 टक्के आवक ही महाराष्ट्रातील व्यापारीवर्गाची होती तर उर्वरित सर्व आवक शेतकरी बांधवांची होती.
सलग दोन शनिवार बाजार बंद
बेळगाव बाजार समितीमध्ये आठवडय़ातून दोन दिवस कांदा-बटाटय़ांचे सौदे होत असतात. शनिवार आणि बुधवारी बाजाराचे दिवस होत. मात्र, निवडणुकीमुळे शनिवारी बाजार बंद होता तर मागच्या शनिवारी मिनी लॉकडाऊनमुळे सौदे बंद होते. शनिवारऐवजी सोमवारी सौदे झाले. सोमवारी आणि बुधवारी आवक स्थिर होती. मात्र, बुधवारी जावक वाढली. याचा परिणाम कांदा दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विकी (महेश) सचदेव यांनी दिली.
ठेवणीच्या कांद्याला मागणी वाढली
बाजारात चांगल्या प्रतीचा व ठेवणीचा लाल कांदा दर 1300 ते 1500 रुपये असा झाला तर दुय्यम दर्जाचा कांदा 800 ते 1300 रुपये असा झाला. सफेद कांदा हलक्मया दर्जाचा होता. त्याचा भाव 800 ते 1300 रुपये झाला.
परराज्यांतील बटाटा दर स्थिर
बुधवारी बाजारात परराज्यांतील बटाटा आवक 7 ट्रक इतकी होती. यामध्ये इंदोरचा बटाटा 3 ट्रक तर आग्रा बटाटा 4 ट्रक इतकी आवक होती. बाजारात आवक-जावक स्थिर होती. याचा परिणाम म्हणून बटाटय़ाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली. इंदोरचा बटाटा 1600 ते 1700 रुपये तर आग्रा बटाटा 1500 ते 1600 रुपये असा झाला.
जवारी बटाटा आवक घटली
बेळगाव तालुका बटाटा उत्पादक क्षेत्रातील स्थानिक जवारी बटाटा आवक अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होत आहे. याचा परिणाम जवारी बटाटा 100 रुपयांनी महागला असल्याची माहिती व्यापारी राजू जाधव यांनी दिली.