क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
शासनाने लॉकडाऊन 4.0 कालावधीत काही प्रमाणात सूट दिल्याने कालपासून कांपालचे इनडोअर स्टेडियम बॅडमिंटनपटू आणि टेबलटेनिसपटूंसाठी खुले करण्यात आले. बॅडमिंटन आणि टेबलटेनिस हे दोन्ही खेळ वैयक्तिक तसेच शारिरीक संपर्क न येणारे खेळ आहेत. या दोन्ही खेळात दुहेरीतही खेळाडूंनी काल सकाळपासून सराव करण्यास सुरूवातही केली आहे, असे गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे म्हणाले.
शासनाने आखून दिलेले निर्बंध आम्ही पाळणार आहोत. खेळ हा आता जीवनाचा एक अविभाज्य ठरला आहे. जीवनात खेळाला तसेच फिटनेसला एक मोठं स्थान आहे. खेळाने मानसिक आणि शारिरीकरित्या तंदुरूस्त राहाता येतं, असे हेबळे म्हणाले. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजेजू यांनी 19 मे पासून संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करून क्रीडा संकुले वापरण्यास अनुमती दिली आहे. गोवा शासनाने आता दोन महिन्यांनंतर क्रीडा संकुले खेळाडूंसाठी खुली केली आहेत.
काल सकाळी कांपाल इनडोअर स्टेडियम पॅडलर्स आणि बॅडमिंटनपटूंच्या सरावासाठी खुली केल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक तसेच उपस्थित असलेल्या गोवा टेबलटेनिस संघटना आणि गोवा बॅडमिंटन संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या आनंदाला जणू काही उधाणच आले. कित्येक दिवसांनी त्यांना बॅडमिंटन रॅकेट्स, टेबलटेनिस बॅट्स, शटलकॉक्स आणि टेबलटेनिस चेंडू हातात घेता आला. गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी यावेळी खेळाडूंशी संपर्क साधला आणि केंद्र सरकार आणि राज्य शासनाचे खेळाडूंच्या आणि संघटनेच्यावतीने आभारही मानले.
गोव्यात होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी नवा साज दिलेले कांपाल इनडोअर स्टेडियमनंतर आता कोविडसाठी वापरात न आलेली केपे, फोंडा, साखळी, चिखली आणि कुडचडे येथल इनडोअर स्टेडियम्सही लवकरच सुरू होणार असल्याचे गोवा क्रीडा प्राधिकरणाने आम्हाला सांगितले आहे, असे संदीप हेबळे म्हणाले.
स्वता एक क्रीडापटू राहिलेले केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजेजूने घेतलेला हा निर्णय चांगला आहे. फिटनेस आणि सरावामुळे इम्युनिटी वाढते तसेच विविध रोगांवरही मात करता येते, असे हेबळे म्हणाले. आम्ही आमच्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आखून दिलेली सर्व मार्गदर्शन तत्वे ठळकपणे आणि विस्ताराने सांगितली असून त्यांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितल्याचे हेबळे यावेळी म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात फिटनेसाठी मी सकाळी एक तास सायकलिंग करत होतो. मात्र बॅडमिंटन कोर्टवर पाय पडताक्षणी मी भांबावून गेल्याचे यावेळी गोव्याचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटपटू डर्वीन बार्रेटो आपली प्रतिक्रिया देताना म्हणाला.
कांपाल इनडोअर खुले होण्याची मी आणि माझा पुत्र आतुरतेने वाट पाहातच होतो, असे वयाच्या 10व्या वर्षी पाचवीत असताना कांपाल बॅडमिंटन कोर्टवर नियमितपणे येणारे आर्नोल्ड रॉड्रिग्स यावेळी म्हणाले. लॉकडाऊनमध्ये फिट राहाण्यासाठी मी अन्य साधनांकडे वळलो. सायकलिंग सुद्धा केली मात्र बॅडमिंटनला पर्याय नव्हताच. परत एकदा कोर्टवर आल्याने मी आनंदीत आहे, असे यावेळी गोव्याचे मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेले रॉड्रिग्स यावेळी म्हणाले.
दरम्यान गोवा बॅडमिटन संघटनेने राज्य मानांकन बॅडमिंटनपटूंची निवड करण्यासाठी 20 मे ते जूनच्या अखेरीस कांपाल स्टेडियमर शिबिराचे आयोजन केल्याची माहिती संदीप हेबळे यांनी शेवटी दिली.