प्रतिनिधी/ पणजी
ब्रह्मकुमारीजतर्फे महाशिवरात्री निमित्त 108 शिवलिंग दर्शन महोत्सव व नैराश्यापासून मुक्ती व उपचार पद्धती या विषयावर व्याख्यानमाला 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कांपाल – पणजी येथील दयानंद बांदोडकर फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रमाची माहिती देणारी 35 मी. लांबीच्या निमंत्रण पत्रिकेचे उद्घाटन मानोसपचार तज्ञ डॉ. दामोदर कुंकळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युनिव्हर्सल क्रियशनच्या संचालिका ज्योतिलक्ष्मी, ब्रह्मकुमारीज गोवा प्रमुख शोभा बहनजी, आयकर निरीक्षक नागराज अंकलेकर, निर्मला बहनजी, आयोजन समितीचे प्रमुख विनती बेहनजी व इतर मान्यवर उपस्थित होते. आजची युवापिढी सुशिक्षित असून ही दिवसेंदिवस नैराश्येच्या गर्तेत सापडत चालली आहे. या मागील कारणे शोधून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुंकळेकर यांनी व्यक्त केले.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त ब्रह्मकुमारीज गोवा शाखेतर्फे यंदा 108 शिवलिंग दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यानिमित्त आध्यात्मिक व आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून नैराश्यापासून मुक्ती व उपचार पद्धती या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे याचा लाभ गोमंतकीयांनी घ्यावा, असे आवाहन शोभा बेहनजी यांनी केले.
सात दिवस चालणाऱया या कार्यक्रमात 6.30 ते 8.30 दरम्यान मुंबईचे डॉ. सचिन परब, मानोसपचार तज्ञ डॉ. गिरीश पटेल व पुण्याच्या वरिष्ठ राजयोगा शिक्षिका सरिता राठी नैराश्यापासून मुक्ती व उपचारपद्धतीवर व्याख्यान देणार आहे. त्याचबरोबर मेडिटेशनवर प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला बेहनजी यांनी केले व आभार निता बेहनजी यांनी मानले.