41 वर्षांनंतर पदक मिळविण्याची भारताला संधी, बचाव भक्कम करण्याची गरज
वृत्तसंस्था/ टोकियो
उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभूत झाल्यानंतर स्वप्नभंग झालेल्या भारतीय हॉकी संघाची आता कांस्यपदकाची लढत जर्मनविरुद्ध गुरुवारी होणार आहे. 41 वर्षांनंतर पदक मिळविण्याची संधी भारताला मिळाली असून रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणाऱया जर्मनीविरुद्ध भारताला बचावातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर असणाऱया भारताला आधीच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमने सतत दडपणाखाली ठेवत बचावफळी खिळखिळी केली होती. त्यामुळे बेल्जियमला अनेक पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि त्याचा त्यांनी लाभ घेत भारताचा 5-2 अशा फरकाने धुव्वा उडविला. बेल्जियमने आपल्या बलस्थानानुसार खेळ केला आणि पेनल्टी कॉर्नर्स मिळविण्यावर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणारा अलेक्झांडर हेन्ड्रिक्स व लोईक लुपेर्ट या स्पेशालिस्टनी त्याचा अचूक लाभ उठविला. हेन्ड्रिक्सने तर हॅट्ट्रिकही नोंदवली. भारतीय संघ दडपणासमोर कोलमडल्याने बेल्जियमचा डावपेच पूर्णपणे यशस्वी ठरला. भारताने त्यांना तब्बल 14 पेनल्टी कॉर्नर्स बहाल केले. त्यामुळे 41 वर्षांनंतर सुवर्ण मिळविण्याचे भारताचे स्वप्नही भंगले. 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवटचे सुवर्ण जिंकले होते.
मात्र हा पराभव मागे टाकत भारताला गुरुवारच्या सामन्यात नव्या जोमाने उतरावे लागेल. बचावात भक्कमपणा आणत आधीच्या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती त्यांना टाळावी लागणार आहे. रुपिंदर पाल सिंग, उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास हे चार जागतिक दर्जाचे ड्रग फ्लिकर भारताच्या भात्यात असले तरी पेनल्टी कॉर्नर्सचे गोलात रूपांतर करण्याचा भारताचा दर अत्यंत कमी व निराशाजनक आहे. बेल्जियमविरुद्ध पाचपैकी केवळ एकावर भारताला यश मिळाले होते. त्यामुळे जर्मनीविरुद्ध भारताच्या बचावफळीतील हरमनप्रीत, रुपिंदर पाल, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास आणि स्टार गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. याशिवाय आपल्या सर्कलमध्ये असताना प्रतिस्पर्धी खेळाडूंवर अनावश्यक टॅकल करणेही टाळण्याची गरज आहे. अशा खेळामुळे बेल्जियमविरुद्ध कर्णधार मनप्रीत सिंगला चौथ्या सत्रात कार्ड मिळाले होते आणि बेल्जियमला लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. यातील शेवटच्या पेनल्टी कॉर्नरवर हेन्ड्रिक्सने गोल नोंदवून सामना आपल्या बाजूने फिरविला होता.
मानांकनाचा विचार करता दोन्ही संघांत फारसा फरक नाही. भारत तिसऱया तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. मात्र जर्मनीवर मात करणे भारताला तितके सोपे जाणार नाही. जर्मनीला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे या सामन्यात ते निश्चितच त्वेषाने खेळतील, अशी अपेक्षा आहे. 2017 मधील हॉकी वर्ल्ड लीग फायनल्समध्ये भारत व जर्मनी यांच्यात कांस्यपदकासाठी लढत झाली होती आणि तेव्हा भारताने 2-1 असा विजय मिळविला होता. पण त्यावेळी जर्मनी संघात नेहमीचे अव्वल खेळाडू नव्हते. जर्मनीने 2008 व 2012 ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्ण मिळविल्यानंतर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळी पोडियमवर येण्याचाच त्यांचा निर्धार असेल. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविण्याच्या बाबतीत जर्मनी भारतानंतरचा दुसरा यशस्वी संघ आहे. भारताने 8 तर जर्मनीने 4 सुवर्णपदके मिळविली आहेत. त्यांचा स्ट्रायकर लुका वेन्डफेडर जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत 6 गोल नोंदवले आहेत. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत या दोन संघात 11 वेळा गाठ पडली असून प्रत्येकाने 4 सामने जिंकले तर उर्वरित तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. गेल्या मार्चमध्ये भारताने जर्मनी दौरा केला आणि त्यावेळी 6-1 असा विजय मिळविला तर दुसरा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविला होता. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया व बेल्जियम यांच्यात सुवर्णपदकाची लढतही होणार