कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी घेतला निर्णय
वार्ताहर / काकती
जिल्हय़ासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले आहे. काकतीतही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काकतीत शुक्रवार दि. 14 ते शुक्रवार दि. 21 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय देवस्थान पंचमंडळ, ग्राम पंचायत, युवा संघटनांनी घेतला आहे.
काकती सर्कल पोलीस स्थानकाचे सीपीआय राघवेंद्र हळ्ळूर यांना भेटून कोरोना संसर्ग हद्दपार करण्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठ दिवसात सर्व देवदेवतांची मंदिरे बंद राहणार आहेत. देसाई गल्लीतील भाजी मार्केटात बसून भाजी विकणाऱयांवर बंदी घालण्यात आली असून सकाळी 8 ते 9 पर्यंत दूध डेअरी सुरू करण्याची मुभा दिली आहे. गावातील कोणीही गावाबाहेर न जाणे, पै-पाहुण्यांनीसुद्धा न येणे, शेत-शिवारातील कामाशिवाय कोणीही बाहेर जाण्यास मज्जाव केला जाणार आहे. विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱयांना दंड व प्रसंगी पोलिसांचा दंडुका, विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करावी असे ठरविले आहे. पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले. यावेळी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सिद्धाप्पण्णा टुमरी (गाडेकर), ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, भावकाण्णा टुमरी, लक्ष्मण पाटील, परशराम नार्वेकर, सुरेश गवी, संभाजी कडोलकर, परशराम धोणजी, श्रीपाद देसाई, बसवाणी निलजकर, संजय सोमाई यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गावांना जोडणारे संपर्क रस्ते लॉकडाऊन
काकती-कडोली शिवारातील संपर्क रस्त्यावर नदीच्या पुलासमोर पेनच्या साहाय्याने मोठे दगड व बाभळीच्या मोठय़ा फांद्या ठेवून रस्ता बंद केला आहे. तर गौंडवाड-काकती शिवारातील संपर्क रस्ता मोठय़ा झाडाच्या फांद्या पेनच्या साहाय्याने ठेवून बंद ठेवण्यात आला आहे.