वार्ताहर / काकती
काकती गावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी जाती, भाषाभेद, राजकारण, बाजूला सारून प्रत्येकाने कार्य करावे, असे आवाहन जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार यांनी केले.
येथील ग्रा. पं.च्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार आणि शिवजयंती उत्साहात ग्राम पंचायत सभागृहात नुकतीच पार पडली.
ग्राम विकास अधिकारी रेवती शिंगे यांनी स्वागत केले. कार्यक्रमात नूतन ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. सदस्य, कर्मचारी व वर्गाने शिवरायांना अभिवादन केले. प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना सुणगार पुढे म्हणाले, ग्रा. पं.च्या विकासकार्यात जि. पं. च्यावतीने ग्रा. पं.ला 24 योजनांचा लाभ मिळतो. याचा लाभ मिळवून देण्यासाठी गोर-गरिबांच्या घरापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. गावची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून, शेती व शेतकऱयांच्या सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर काकती-गौंडवाडला जोडणारा संपर्क रस्ता आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निधीतून आठवडय़ाभरात पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन केले. ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी, शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचविण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची असून, ग्रा. पं. माध्यमातून समाजसेवा करण्याची हीच संधी असल्याचे प्रतिपादन केले. ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी ‘ग्रा. पं, सदस्यांना मार्गदर्शन केले. नूतन सदस्यांना शाल, पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रमुख अकाऊटंट हावनगोळ ए. आय. यांनी केले. सेक्रेटरी अरुण नाथबुवा, लेखनिक सामनाथ बाबी आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होता.