चाखता येणार पारंपरिक पदार्थांची चव : शिरीष गोगटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
देशभरातील शेकडो पारंपरिक पदार्थ आता खवय्यांना एकाच छताखाली चाखता येणार आहेत. काकती गोगटे प्लॉझा येथील ‘स्पाईसी ब्लेन्ड्स’ या रेस्टॉरंटचा सोमवार दि. 18 रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे. गोगटे उद्योग समुहाचे अध्यक्ष अरविंद गोगटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामध्ये खवय्यांना पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यातील काही पदार्थ हे प्रथमच बेळगावमध्ये चाखता येणार असल्याची माहिती गोगटे उद्योग समुहाचे संचालक शिरीष गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोगटे कुटुंबीयांचे बेळगावच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यामुळे गोगटे परिवार व बेळगावकरांचे अनोखे नाते राहिले आहे. यापूर्वी गोगटे समुहाने सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाला बेळगावच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता गोगटे परिवारातील तिसरी पिढी उद्योग क्षेत्रात येत आहे. पंचतारांकित हॉटेल मेरीएट, आररीश हाऊसच्या यशानंतर आता ‘स्पाईसी ब्लेन्ड्स’ हे रेस्टॉरंट सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इतर जिल्हय़ांसोबतच परराज्यातील शेकडो पर्यटक दररोज बेळगावला भेट देतात. त्यामुळे त्यांच्या आवडी-निवडीनुसार त्यांना खाद्यपदार्थ लागतात. एखादे कुटुंब जरी जेवणास आले तरी प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगळय़ा असतात. या सर्वांचा विचार करून स्पाईसी ब्लेन्ड्स या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. खवय्यांना पारंपरिक खाद्यपदार्थांसोबतच अनेक नव्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, अशी माहिती संचालक माधव गोगटे यांनी दिली.
या रेस्टॉरंटमध्ये बेळगावच्या स्थानिक पदार्थांसोबत साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, एशियन फूड, चायनिज खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. साऊथ इंडियनमधील अप्पम हा पदार्थ बेळगावकरांना चाखता येणार आहे. यासोबतच इतर नावीन्यपूर्ण व रूचकर खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळणार आहेत. सोमवार ते गुरुवार सायंकाळी 7.30 ते 11 तर शुक्रवार ते रविवार दिवसभर रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले असेल, अशी माहिती रेस्टॉरंटचे व्यवस्थापक दीपक चौबे यांनी दिली. यावेळी गोगटे समुहाचे संचालक सिद्धार्थ गोगटे व ओंकार गोगटे उपस्थित होते.