वार्ताहर /काकती
काकती शिवारात अनेक ठिकाणी लोंबकळणाऱया विद्युत तारा, वाकलेले खांब मोठय़ा धोकादायक स्थितीत आहेत. परिणामी विद्युततारांच्या स्पर्शाने, अपघात झाल्यास ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. असे असताना काकती हेस्कॉम विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने हेस्कॉमचे प्रयत्न फोल ठरले असून भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
काकती औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा करणारे केंद्र असून येथील शिवारातून ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करण्यात येतो. यामुळे काकती शिवारात सर्वत्र वीज खांब लोंबकळणाऱया वीजतारांचे जणू जाळेच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गौंडवाड, कडोली, होनगा अशा गावांना जाणाऱया टी. सी. खांबांच्या लाईन, तर विद्युत डीपींनी जोडून जाणाऱया एल. टी. वीज खांबांच्या लाईन यामुळे वीज तारांचे जाळे निर्माण झाले आहे.
येथील हत्तीतट शिवारातील सर्व्हे नं. 253 मधील निळकंठ मोळेराखी यांच्या शेतात वाकलेला खांब तर काटे शिवारात सचिन गवी यांच्या सर्व्हे नं. 295/11, आनंद टुमरी यांच्या शिवारात लोंबकळणारी कडोली टीसी लाईन केवळ साडेसहा फुटांवर आहे. वीरभद्र मुंगारी यांच्या सर्व्हे 303 येथील लोंबकळणाऱया तारा, भरमतट्ट नदीकाठी झाडाझुडुपांतून गेलेली होनगेकर टीसी लाईन पूर्णपणे कोलमडून गेली आहे.
ही लाईन वीज खांबांसह ओढून बसविणे गरजेचे आहे. येथील शेतकऱयांनी अनेकवेळा हेस्कॉमकडे तक्रारीचे गाऱहाणे मांडले होते. येथील कळ्ळीमार्ग काटे शिवार सोमाई टीसीला जोडण्यात आलेल्या वीज लाईनचे खांब उंचीवर बसविणे गरजेचे आहे.
सबब जीवावर बेतण्याची शक्यता
अशा परिस्थितीत ऊस कारखान्यांना पाठविण्यात येत आहे. बांबूचा साहाय्याने ट्रक, ट्रक्टरला लागू नये याकरिता वीजतारा उंचावताना धोका पत्करून कसरत करावी लागत आहे. अशाच प्रकारे गेल्या पाच वर्षांपूर्वी सिद्दाप्पा मोळेराखी यांचे ट्रक्टरमधून पिंजर ओढताना वीज तारेचा स्पर्श होऊन नुकसान झाले होते. अशा घटना घडल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उपस्थित झाला आहे. याबाबत अनेकवेळा हेस्कॉम केंद्रात सांगूनदेखील पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण वारंवार सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने काकती विभागीय केंद्राने खांब व लोंबकळणाऱया तारांचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.