वार्ताहर /काकती
येथील जागृत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचा इंगळय़ांचा प्रमुख सोहळा मंगळवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. सोमवार दि. 4 रोजी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिर येथून सनई-चौघडय़ांच्या मंगल निनादात, पालखी सोहळय़ाचे आगमन, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रुद्रपाक देवस्थानात झाले. हिरेमठ स्वामींच्या सानिध्यात हक्कदार, मानकरी, देवस्थान पंचांच्या उपस्थितीत देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर देवस्थान अग्निकुंडाच्या पवित्रस्थळी आली. गाऱहाणे घालून पालखी सोहळय़ाचा मंदिरात प्रवेश झाला.
आंबिल गाडय़ांचा मान-औक्षण
सोमवारी सायंकाळी आंबिल गाडय़ांची सुवासिनींनी पंचारती केली. देवस्थानचे हक्कदार पुजारी सवाद्य मिरवणुकीने सांगली सरकारचा मानाचा आंबिल गाडा आणण्यासाठी हक्कदार चौगुले-सनदी यांच्या निवासस्थानातून निघाला. त्यानंतर ईतर गाडे एकापाठोपाठ निघाले. मात्र, देसाई गल्ली उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारापाशी अडचणींमुळे थोडा गोंधळ झाला. गावातील सर्व गाडे सजविलेल्या बैलजोडी, आंबिल, घुगऱया घेऊन सहभागी झाले होते. रात्री आंबिल घुगऱयांचा नैवेद्य देवाला ठेवण्यात आला. मंदिराला प्रदक्षिणा घालून घुगऱयांचा नैवेद्य वाटण्यात आला.
शोभा गाडय़ांची मिरवणूक
सोमवारी गाडय़ाचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातील भावकाई गल्ली, कुरबर गल्ली, होळी गल्ली, मारुती गल्ली व मुत्तेनट्टी आदी शोभा गाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रत्येक मंडळाने विविध कलाकुसरीने, आकर्षक विद्युत रोषणाईने गाडे सजविले होते. वाद्यवृंदाच्या ताफ्यात गुलालाची उधळण होत होती. रात्री उशिरा मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात पोहोचली. त्यानंतर विधिवत इंगळय़ांची लाकडे प्रज्वलित करण्यात आली. शोभा गाडय़ांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून मंगळवारी सकाळी गाडय़ांची सांगता झाली.
इंगळय़ाचा धार्मिक सोहळा
इंगळय़ांच्या धार्मिक विधिवत सोहळय़ात देवस्थानचा नंदीकोळ, कणबर्गी सिद्धेश्वर नंदीकोळ, सांभाळ, धुपारती, घंटानाद, हक्कदारी, मानकरी व भाविकांनी अग्नीकुंडाला प्रदक्षिणा घातली. हा सोहळा भाविकांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारा होता. अग्निकुंडाचे पूजन, कालघटकेनुसार प्रदक्षिणा होताच हर हर सिद्धेश्वराच्या जयघोषात इंगळय़ांतून हजारो भाविक धावले. याचे दर्शन घेऊन आनंद लुटला. दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी लोटली होती. पहाटेपासून मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती. मागणी केलेल्या भाविकांनी दीडनमस्कार व तुलाभार देवाला अर्पण केले. रात्री होळी चौकात ऑर्केस्ट्रा व नाटकाचा कार्यक्रम झाला.