गत वर्षांचे महाराष्ट्र केसरी ‘किताब’च्या शर्यतीतून बाहेर
ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या खुल्या गटाची अंतिम लढत मोठय़ा चुरसीच्या वातावरणात पार पडली. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके आज महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाडय़ात आमनेसामने उतरणार आहेत.
महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणानी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या 4 सेकंदतही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत ‘काटे की टक्कर’ देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली. शैलेशने ज्ञानेश्वरवर 11-10 अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व मनाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत जागा निश्चित केली.
नाशिक जिह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत काटकेला 5-2 गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही आजच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. तोडीसतोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काका पवार म्हणाले, दोन्हीही मल्ल माझ्यात तालमीत तयार झाले आहेत. दोघेही ग्रीको रोमन कुस्ती खेळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक खेळाडू झाले आहेत. मात्र, महाराष्ट्र केसरी कितबासाठी दोघेही प्रथमच खेळत आहेत. ते तगडे पैलवान आहेत. याचा माला विश्वास होताच म्हणूनच दोघांनाही वेगवेगळय़ा विभागातून मैदानात उतरविले. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले. दोघेही माझेच पठ्ठे असल्याने घरात गुण्यागोविंदाने राहायचे मात्र, गादीवर प्रतिस्पर्धी म्हणूनच राहायचे हे संगितले आहे. विजयी कोणीही झाला तरी मला आनंदच असणार आहे. गेली कित्येक वर्ष आमच्या तालमीचे पहिलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र, विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.
शैलेश शेळके म्हणाला, मी गेले अनेक वर्षे काकांच्या तालमीत तयार झालो आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लष्करात भारती झालो. पण कुस्ती मात्र, कधीही सोडली नाही. उद्याच्या कुस्तीसाठी मानसिक तयारीच महत्वाची आहे. उद्या मी डोक्मयाने खेळ करणार आहे. किताबच्या शर्यतीत पोहचेन, याचा आत्मविश्वास मला होता.
हर्षवर्धन म्हणाला, उद्याची कुस्ती गादीवर असून मी गेले सहा महीने गादीच्या कुसतीचा सराव करत आहे. आम्ही दोघे एकमेकाचा खेळ जाणतो. त्यामुळे उद्या जो जास्त चांगली कुस्ती खेळेल तोच विजयी होईल.