अखिलेश यादव यांची घोषणा – शिवपाल यांच्या पक्षाला घेणार सोबत
वृत्तसंस्था/ लखनौ
दिवाळी सणादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वतःचे काका शिवपाल यांना मोठी भेट दिली आहे. 2022 मध्ये होणाऱया उत्तरप्रदेश विधनासभा निवडणुकीत समाजवादी पक्ष शिवपाल यांचा पक्ष तसेच सर्व छोटय़ा आणि प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.
शिवपाल यांचा पूर्ण सन्मान केला जाईल. भाजप सरकारच्या काळात महागाईने सर्वजण त्रस्त आहेत, शेतकरी, तरुण-तरुणी सर्वांचे हाल होत आहेत, सरकार शेतकऱयांना खत देखील पुरवू शकत नसल्याची स्थिती असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्या काळापासूनच अखिलेश आणि शिवपाल यांचे बिनसले होते. या कटुतेचा अंत आता मुलायम सिंह यादव यांच्या जन्मदिनी होऊ शकतो. 22 नोव्हेंबर रोजी मुलायम यांचा जन्मदिन आहे. त्यादिवशी अखिलेश आणि शिवपाल जाहीरपणे एकत्र येणार असल्याचे मानण्यात येत आहे. अखिलेश यादव यांनी कानपूर तर शिवपाल यांनी मथुरा वृंदावन येथून प्रचारमोहिमेस प्रारंभ केला आहे.
समाजवादी पक्ष तसेच सरकारमध्ये शिवपाल यांचा वरचष्मा दिसून यायचा. पण 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवपाल आणि अखिलेश यांच्यात वितुष्ट आले. या पार्श्वभूमीवर शिवपाल यांनी नवा पक्ष स्थापन केला होता. या पक्षामुळे समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला होता. पण आता शिवपाल यादव हे समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.