प्रतिनिधी / कुडचडे
बाणसाय, कुडचडे येथील रहिवासी तसेच कुडचडेचे व्यापारी व कुडचडे पालिकेचे माजी नगराध्यक्ष परेश भेंडे यांचा पुत्र ओम भेंडे (वय 19 वर्षे) याचा मंगळवारी रात्री उशिरा काकुमड्डी येथे झालेल्या स्वयंअपघातात मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात काकुमड्डी येथे रात्री 11.30 नंतर झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, ओम भेंडे हा स्वतःची रॉयल एनफिल्ड दुचाकी घेऊन घरी येत असताना हा अपघात झाला. अपघाताचे मुख्य कारण काळू शकलेले नाही. ओम याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे भेंडे कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले असून त्याच्यापश्चात आई-वडील, एक बहीण व अन्य असा परिवार आहे. ओम याच्या अपघाती निधनामुळे कुडचडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुरवस्थेमुळे रस्ता अपघातप्रवण
सदर अपघात ज्या भागात व ज्या रस्त्यावर झाला आहे त्या ठिकाणी याअगोदर कित्येक अपघात झाले असून कित्येक लोक दगावलेले आहेत. सदर ठिकाणी रस्त्याच्या खालून गटाराचे काम करण्यात आले आहे. मात्र ते काम व्यवस्थित झालेले नसून त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध दोन खड्डे कायम पडलेले दिसतात. सदर खड्डे बुजविण्याची मागणी घेऊन कित्येक वेळा सामाजिक संघटनांनी तसेच स्थानिक लोकांनी संबंधित अधिकारिणींकडे तक्रारी केल्या. मात्र तात्पुरती डागडुगी करून या विषयाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून आलेले आहे. तरी परत अपघात होऊ नये यासाठी ताबडतोब या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी सदर भागातील लोकांकडून तसेच वाहनचालकांकडून होत आहे.