कागल / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हयात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. याचा विचार करून कागलच्या कोरोना केअर सेंटरमध्ये नवीन २५० बेड तयार केले जाणार आहेत. त्यासाठी कोविड.केअर सेंटरच्या शेजारील दोन गोडाऊनमध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे. देवचंद महाविद्यालयाचा वापरही कोरोना
रूग्णांसाठी केला जाणार आहे. जिल्हयातील वाढती रूग्णसंख्या आणि कागल तालुक्यात उपलब्ध असलेल्या सुविधा यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हयात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. गेले काही दिवस दररोज200ते 250 रूग्ण आढळून येत आहेत . त्यामुळे रूग्णांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत . कागल शहरातही प्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन नाक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
तसेच ट्रकचालकांचा अतिरिक्त माल ठेवण्यासाठी दोन मोठी गोडाऊनही उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी स्वच्छतागृहांची चांगली सोय आहे . शहराबाहेर या इमारती असल्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्याची पाहणी केली होती. प्रशासनाने त्यांचा वापर आता कोविड केअर सेंटरकरिता केला . पहिल्यांदाच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा वापर कोविड केअर सेंटरकरिता करण्यात आला आहे. याठिकाणी स्वॅब घेऊन रूग्णावर उपचार केले जात आहेत.
तसेच सौम्य लक्षणे असलेल्या आणि संशयीत रूग्णांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हयात कोरोना रुग्णांचीसंख्या वाढत चालल्याने कोरोना केअर सेंटर जवळील दोन गोडाऊनमध्ये २५0 बेड ठेवण्यात येणार आहेत. तालुका खरेदी विक्री संघाने चाळीस बेड दिले असून हे बेड येथे ठेवण्यात येणार आहेत . आणखी २१० बेड लवकरच उपलब्ध केले जातील. असे तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले.