कागल / प्रतिनिधी
कागल येथे आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या कुटूंबातील सदस्यांसह स्वॅब घेतलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले. यामुळे कागलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील यशील पार्कातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला. तो कोल्हापूर येथे एसटी कार्यालयात नोकरीस आहे. याचबरोबर नारळ विक्रीचा व्यवसाय तो करत होता. कागल शहरासह सिध्दनेर्ली नदीकिनारापर्यंत त्याने दुकानदारांना नारळ विक्री केली आहे.
त्याच्या जवळच्या संपर्कात एकूण ९६ व्यक्ती आल्या होत्या. त्यामध्ये एसटी विभागासह व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे शहरासह एसटी विभागात खळबळ उडाली होती. एकूण ६४ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरित ३२ जणांना डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी २६ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील नातेवाईकांसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.