राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : संकेश्वर नगरपरिषद कार्यक्षेत्रात आणखी प्रदेशांचा समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बेळगाव जिल्हय़ातील कागवाड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देऊन त्याची घोषणा केली आहे. तसेच संकेश्वर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात आणखी प्रदेशांचा समावेश करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. संकेश्वर शहरालगत असलेल्या गडहिंग्लज रोडला लागून असलेल्या वसाहतींसह आजुबाजूचा परिसर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होणार आहे. तसा प्रस्ताव यापूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. आता त्याची दखल घेण्यात आली आहे.
बेळगावमधील यरगट्टी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आतापर्यंत यरगट्टी शहराचा विस्तार वाढला आहे. शिवाय लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अनुकूल व्हावे यासाठी यरगट्टी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात येणार आहे. परिणामी, या भागातील विकासकामांसाठी अधिक अनुदानाची तरतूद केली जाणार आहे. तसेच नगरपंचायत कार्यालयाबरोबरच इतर महत्त्वाची कार्यालयेही स्थापन होणार आहेत. याचा स्थानिक जनतेला लाभ होणार असून सुविधांमध्येही भर पडणार आहे.
कारवार जिल्हय़ातील मुंची ग्रामपंचायतीला देखील नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील विविध शहरांमध्ये 98 नागरी वसाहती निर्माण करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. कर्नाटक राज्य गृहनिर्माण मंडळाच्या वतीने राज्यातील 98 ठिकाणी संयुक्त वसती योजना किंवा वसाहती निर्माण केल्या जाणार असून त्यासाठी 7,275 कोटी रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
व्हीटीयुच्या प्रादेशिक कार्यालयांचा होणार विकास
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये 42.93 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध खात्यांमध्ये रिक्त असणारी बॅकलॉग पदे भरती करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजकल्याणमंत्री बी. श्रीरामुलू यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीच ाr पुनर्रचना होणार आहे.
बेंगळूर मेट्रो रेल्वे योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या समितीत तीन अतिरिक्त सदस्यांचा समावेश होणार आहे. सध्या या समितीत 12 सदस्य आहेत. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त, विभागीय रेल्वे प्रमुख आणि केआरआयडीच्या व्यवस्थापकीय संचालकांचाही या समितीत समावेश करण्यास संमती देण्यात आली आहे.
कागवाडमध्ये गुलाल उधळून जल्लोष
कागवाड : राज्य सरकारने कागवाड ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिल्याची घोषणा केल्यामुळे कागवाड येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तरुणांनी फटाके उडवून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. कागवाडचे आमदार व राज्याचे वस्त्राsद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे पाठपुरावा करून नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले. कागवाडचे जि. पं. सदस्य अजित चौगुले यांनी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, वस्त्राsद्योगमंत्री श्रीमंत पाटील, भाजप युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या कामास यश आले आहे. कागवाड नगरपंचायत होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीदेवी सदाशिव चौगुले, सदस्य रमेश चौगुले, काकासाहेब पाटील, ता. पं. सदस्या ज्योती विनोद देवण यांच्यासह इतरांनी मागणी केली होती. त्याची पूर्तता झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.