वार्ताहर/ उगार खुर्द
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जारी केला आहे. तसेच संचारबंदीही लागू केली आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनाकारण फिरण्यासाठी बाहेर येत होते. कागवाड पोलिसांनी अशा 110 दुचाकीस्वारांवर कारवाई करीत या दुचाकी जप्त केल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र काही उपद्रवी विनाकारण फिरत असल्याने त्यांच्या दुचाकी कागवाड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. कागवाड तालुक्याच्या काही अंतरावर सांगली जिल्हय़ाची सीमा आहे. सध्या सांगली जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्ण असल्याने कागवाड तालुक्यातही धास्ती वाढली आहे. त्यामुळे कागवाड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.