वार्ताहर/ शिरगुप्पी
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवार 15 पासून कागवाड तालुका लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी कडक करण्यात आल्याने कागवाडसह तालुका शंभर टक्के बंद असल्याचे पहावयास मिळाले.
चिकोडी, रायबाग तालुक्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून तालुक्यातील प्रामुख्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये येणारी वर्दळ थांबली आहे. केवळ मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. तसेच पासधारकांना मुभा देण्यात आल्याची माहिती कागवाडच्या तहसीलदार प्रमिला देशपांडे यांनी दिली. शिरगुप्पी, जुगूळ, उगारखुर्द, कृष्णा कित्तूर, ऐनापूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेकांचे स्वॅब अद्याप प्रलंबित आहेत. महसूल खाते, पोलीस व आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यात खबरदारी घेण्यात येत आहे.
कागवाड, शिरगुप्पी, शेडबाळ, उगारखुर्द, ऐनापूर, मंगसुळी, मोळे येथेही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिरगुप्पी-मांजरी, उगार-उगारखुर्द, कागवाडसह महाराष्ट्राला जोडणाऱया रस्त्यांवर बंदोबस्त ठेवून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे.
अथणी तालुक्यात कडकडीत बंद
अथणी : अथणी तालुक्यात अथणी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला असून आतापर्यंत 105 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे अथणी तालुका प्रशासनाने आणि येथील व्यापाऱयांनी स्वयंघोषित लॉकडाऊन जारी केला होता. तर प्रशासनाने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन बुधवारपासून आठवडाभर टाळेबंदीचा आदेश काढला आहे. याची अंमलबजावणी अथणी तालुक्यात कडक करण्यात आल्याने तालुक्यात शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
तालुक्यातून आतापर्यंत 2505 स्वॅब घेण्यात आले असून यापैकी 1980 स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 100 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर अद्याप 400 हून अधिक स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. अथणी शहरात व्यापाऱयांनी स्वंघोषित बंद केला होता. आता प्रशासनानेही अंमलबजावणी केल्याने अथणी बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे. नजीकच्या मिरज-सांगली तालुक्याशी अथणी शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क राहतो. यामुळे तालुक्यात मोठय़ा संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. याची दखल घेत जत, कवटेमहाकाळ, मिरज व सांगलीशी जोडणाऱया मार्गांवर तपासनाके उभारुन रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
घरीच राहून सहकार्य करा
घटप्रभा : संपूर्ण जगाला वेढलेल्या कोरोना विषाणूला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन असताना घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अतिरिक्त पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी केली. ते बुधवारी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोकाक येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
शहरातील बसवेश्वर सर्कल भागात भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करताना कायदा व सुव्यवस्था राखावी, अशा सूचना दिल्या. तसेच कोणाकडूनही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असेही सांगितले. गोकाक व मुडलगी तालुक्यात आजपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु असून यामुळे येथील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठप्प झाले आहे. यावेळी रेड्डी यांच्यासोबत गोकाक सीपीआय गोपाळ राठोड, उपनिरीक्षक ए. पी. अमीनभावी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
दवाखाना सील, मंगसुळीकर धास्तावले
मंगसुळी : येथील 62 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच मंगसुळीकर धास्तावले आहेत. दरम्यान कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाधिताने उपचार घेतलेला येथील दवाखानाही सील करण्यात आला आहे.
मंगसुळीनजीकच्या आरग, शिंदेवाडी, ऐनापूर, उगारखुर्द, शेडबाळ, कागवाड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र शिरगुप्पीमध्ये अद्याप कोणाला बाधा झाली नव्हती. मात्र येथील 62 वर्षीय वृद्धाला कोरोना होताना गावात शिरकाव झाला. यामुळे खबरदारी म्हणून ग्रा. पं. व आरोग्य खात्याने 15 ते 22 जुलै अखेर गाव बंदचा निर्णय घेतला आहे. तसेच गावात स्वच्छता मोहीम व जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णावर बेळगाव येथे उपचार सुरु आहेत. तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आले आहे.