गोडोली / प्रतिनिधी :
वाहनांच्या काचांवर फिल्मींग लावण्यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र कारवाई होत नसल्याने कोणतीही परवानगी न घेता सध्या काचांना फिल्मींग लावण्याची क्रेझ वाढली आहे. अशा वाहनांवर आरटीओ पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला असून, कारवाई आणि फिल्मींग टराटरा फाडून टाकायला सुरुवात केली आहे.
वाहनांच्या काचांवर फिल्मींग लावून फिरण्याची बडय़ांबरोबर सेकंड हँण्ड वाहन घेणाऱ्या अनेकांना प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. ज्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काचेला फिल्मींग लावायचे असेल. त्यांना योग्य कारणास्तव आवश्यकता असल्याचे पुराव्यानिशी अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून परवानगी दिली जाते. अशी परवानगी न घेताच सर्रास फिल्मींग लावलेली वाहने रस्त्यावर फिरताना दिसतात. कारवाई होत नसल्याने आता फुटकळांनी सुध्दा सेकंड हँण्डमध्ये भंगारच्या लायकिची वाहने घेऊन त्यालाही फिल्मींग लावून फिरायला सुरुवात केली आहे. अशी वाहने दिसत असूनही वाहतूक पोलीस कारवाई करत नाहीत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जिल्ह्यात फिरणाऱ्या भरारी पथकाने आता दिसले फिल्मींग की टराटरा फाडायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कायदेशीर कारवाईचा धडाका लावला आहे. ज्यांना फिल्मींग लावायचे असेल त्यांनी पोलीस विभागाकडून नियमानुसार परवानगी घ्यावी. परवानगी नसल्यास कडक कारवाई आणि फिल्मींग फाडून टाकले जाणार आहे. तशा सुचना सर्व भरारी पथकांना दिल्या आहेत. वाहनाच्या काचांवर फिल्मींग लावू नका, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना केले.