डोळ्यांच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते काजळ. आजकाल वेगवेगळ्या शेड्सचं काजळ मिळतं. काजळ लावल्यानंतर डोळ्यांचा नूर पालटत असला तरी ते योग्य पद्धतीने लावणं आवश्यक असतं. पसरलेलं काजळ सौंदर्यात बाधा आणतं. म्हणूनच अनेक जणी स्मज फ्री म्हणजेच न पसरणारं काजळ वापरतात. मात्र असं काजळही पसरू शकतं. काजळ पसरू नये म्हणून काय करता येईल याविषयी…
- डोळ्यांलगतची त्वचा तेलकट आणि घामट होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी डोळ्यांवर पाणी मारून नीट पुसून घ्या. यानंतर एखादं कापड किंवा कापूस थंड पाण्यात ठेऊन डोळ्यांवर ठेवा. यानंतर पापण्यांलगतचा भाग ईयर बड्सने स्वच्छ करून घ्या. मग काजळ लावा. या उपायामुळे डोळ्यांलगतची त्वचा तेलकट आणि घामट होणार नाही.
- काजळ लावल्यानंतर डोळ्यालगतच्या भागात थोडी पावडर लावा. पावडरमुळे त्वचा फार तेलकट होणार नाही.
- सध्या चेहर्यावर मास्क असल्यामुळे डोळ्यांच्या मेकअपवर भर असतो. तुम्हालाही खास प्रसंगासाठी हेवी आय मेक अप करायचा असेल तर सगळं काही योग्य पद्धतीने सेट व्हायला हवं. चेहर्याचा मेक अप करण्यासाठी फाउंडेशन, बीबी क्रीमचा बेस आवश्यक असतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मेक अपसाठीही बेस लागतो. तुम्ही प्रायमर किंवा फाउंडेशनचा वापर करून हा बेस देऊ शकता. यामुळे काजळ डोळ्यांलगत बराच काळ टिकून राहील.
- दमट वातावरण आणि डोळ्यांमधून वारंवार पाणी येत असेल्यास कोणतंही काजळ वापरू नका. अशा वेळी नॉन डाईंग फॉर्म्युलावालं वेगन काजळ निवडा. त्यातही पेन्सिल काजळ निवडलं तर उत्तम.
- लिपस्टिकप्रमाणेच काजळ सेट व्हायलाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच आय मेक अप करू नका. पाच ते दहा मिनिटं थांबा.