मकर संक्रांत आता जवळ येऊन ठेपली आहे. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत तिळगुळाची देवाणघेवाण रथसप्तमीपर्यंत सुरूच असते. तिळाच्या वडय़ा सर्वचजण घरी बनवितात. पण तिळगुळ घरी बनविणे थोडे जिकिरीचे काम असते. त्यासाठी हवामानही अनुकूल लागते. थंडीही कडाक्याची पडत आहे. अशा वेळी तिळगुळाला काटा चांगला येतो. तिळगुळ म्हणजे तीळ किंवा फुटाणे किंवा शेंगदाणे यावर साखरेचा पाक असतो. काहीजण लवंग, भोपळय़ाच्या बिया, काजूगर किंवा बडिशेपदेखील यासाठी वापरतात.
साहित्यः 2 वाटय़ा साखर, पाऊण वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, 1 वाटी तीळ किंवा कोणतेही वर दिलेले साहित्य चालेल. हवा असल्यास खाण्याचा रंग.
कृतीः पाणी व साखर पॅनमध्ये घेऊन उकळण्यासाठी ठेवा. उकळू लागताच आच बंद करून पातळ कापडावर ते ओतून गाळून घ्या. यामध्ये साखरेत असलेली मळी कापडावर येईल. खाली असलेले पाणी पुन्हा गरम करत ठेवा. काही मिनिटांनी पुन्हा गाळून घ्या. असे दोन तीन वेळा करून त्यातील मळी काढून घ्या. नंतर हे पाणी उकळत असताना त्यात दूध ओतून नंतर पुन्हा एकदा ते गाळून घ्या. पुन्हा गरम करत ठेवा. या पाकाचा एखादा थेंब ताटात टाकून तो पसरतो का पाहा. तो न पसरता घट्ट गोळीसारखा राहिला पाहिजे. असे झाल्यास आच बंद करून तो पाक रात्रभर थंड करत ठेवा. नंतर कोळशाच्या शेगडीवर अत्यंत मंद आचेवर पितळीची परात ठेवून त्यात तीळ व इतर पदार्थ घाला. यावर एखादा चमचाभर पाक घालून ते हाताने पसरत राहा. यावेळी कोणत्याही प्रकारचा चमचा वापरू नका. हाताने पसरताना हळुवारपणे हात हलवावा जेणेकरून साखर तुटणार नाही. आच हवी असल्यास मंद करा किंवा बंद करा. असे थोडा वेळ करून झाल्यावर उरलेले दुसऱया दिवशी करा, असे साधारण 4 ते 5 दिवस करावे लागेल. हवा असल्यास खाण्याचा रंग पाकात घालू शकता. हे करताना अतिशय हळुवारपणा आवश्यक आहे. घिसाडघाईने हे काम करू शकत नाही. याला चांगला काटा येणार नाही.
Previous Articleनागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशदोही
Next Article सुरक्षा परिषदेत भारताचा पाकवर हल्लाबोल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.