मडगाव रेल्वे स्थानकावरुन झाली होती गायब : अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा सापडली,बॅगेत होती 40 जीवंत काडतुसे, शस्त्रे
प्रतिनिधी /मडगाव
चाळीस जीवंत काडतुसे आणि इतर शस्त्रे असलेली गायब झालेली एक बॅग अथक परिश्रमानंतर मडगाव पोलिसांनी अखेर हुडकून काढली. ही घटना मडगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री उशिरा घडली.
प्राप्त माहितीनुसार गोवा विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर उत्तर प्रदेशात चालू असलेल्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्तासाठी आयआरबी पोलिसांची एक तुकडी जाणार होती. 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रेल्वेची वाट पाहात ही तुकडी मडगाव रेल्वे स्थानकावर थांबली होती.
रेल्वे आली तसे घाईघाईने या तुकडीतील सर्वजण रेल्वेत चढले. मात्र, एका पोलिसाची बँग गायब झाली. या बँगेमध्ये किती किंमती सामान होते याची किंमत पोलिसांनाच माहित होती म्हणून ज्या क्षणी ही बॅग गायब झाल्याचे आढळून आले त्याचक्षणी ही माहिती पोलिसांच्या कानी घालण्यात आली.
शेवटी गटारात सापडली बॅग
मडगाव पोलिसांनी अनेक पोलीस कर्मचाऱयांचे साहाय्य घेतले आणि कसून तपासणी सुरु केली. मडगाव रेल्वेस्थानक, आजुबाजूच्या परिसराचा शोध घेण्यात आला. पाहतो तो ही बॅग मडगाव अग्निशामक दलाचे कार्यालय ते दवर्ली जंक्शन दरम्यानच्या एका गटारमध्ये टाकून देण्यात आली होती. ज्यावेळी ही बॅग सापडली त्यावेळी त्यातील 40 जीवंत काडतुसे व इतर पोलीस हत्यारे होती. मात्र, या पोलिसांचे वैयक्तिक सामान मात्र गायब झाले होते.
पोलीस बॅग गायब झाली कशी?
मडगाव रेल्वेस्थानकावर चोरटे आपल्या ‘सावजा’ वर नजर ठेऊन असतात याचा अनुभव तपास यंत्रणेला अनेकवेळा ओलेला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रेल्वे येण्याची प्रतिक्षा पोलीस करीत होते त्यावेळी तेथे असलेले चोरटे आपल्या ‘सावजा’वर नजर ठेवून होते. मात्र या चोरटय़ांना आपल्यावर पाळत ठेवणारा सीसीटीव्ही चालू आहे याची कल्पना नसावी.
मात्र, तपास यंत्रणेने मडगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानंतर या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होणार आहे. संशयित दिसणार आहे आणि त्यानंतर त्याला पकडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या दोन – तीन दिवसात संशयिताचा चेहरा तपास यंत्रणेपुढे येणार आहे आणि त्यानंतर या संशयिताचे नाव जनतेसमोर येणार आहे.
मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक दिलखुष वेळीप, हवालदार समीर नागनुरी, गोरखनाथ गावस, ओर्लांद फर्नाडिस, विशाल प्रभू, इजाज साकली, कल्पेश खोलकर, स्वप्नेश वेळीप, धिरज मलीक, प्रसाद बोरकर, एल्ड्रीक मिनेझीस व आशिश आरोलकर यांनी ही बॅग शोधून काढण्याच्या मोहिमेत भाग घेतला.