प्रतिनिधी /म्हापसा
गेल्या चार पाच दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोपिसवाडा वेर्ला- काणका, म्हापसा येथील माजी सरपंच मोहन दाभाळे, गोकुळदास दाभाळे, महेश मांजरेकर व दत्ताराम साळगावकर यांच्या चार गाडय़ांवर भलेमोठे आंब्याचे झाड पडून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी पहाटे सुमारे 6.45 च्या सुमारास घडल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाने दिली.
वेर्ला काणका पंचायतीचे माजी सरपंच मोहन दाभाळे यांच्या जीए-03 एच-7033 क्रमांकाच्या व्हॅगन आर गाडीवर झाड पडल्याने गाडीची मोठय़ा प्रमाणात मोडतोड झाली. यात 2 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मोहन दाभाळे यांनी दिली. गोकुळदास दाभाळे यांच्या जीए-03-सी 8054 क्रमांकाच्या अल्टो कारवर झाड पडून 1 लाख 50 हजार, महेश मांजरेकर यांच्या एमएच-07 एजे-5232 क्रमांकाच्या अल्टो कारवर झाड पडून 70 हजार रुपयांचे तर दत्ताराम साळगावकर यांच्या जीए-03 झेड-1817 या टोयाटो कारवर झाड पडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला कळताच दलाचे साहाय्यक अधिकारी अशोक परब, दलाचे जवान इप्रिमो डायस, प्रकाश घाडी व संजीव कोरगावकर यांनी घटनास्थळी जाऊन भर पावसात चारही जवळ जवळ असलेल्या वाहनांवर पडलेले आंब्याचे भलेमोठे झाड कापून वेगळे केले. यात वाहन मालकांना सुमारे पाच लाखा रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर अग्निशमन दलाने साडेतीन लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे.