प्रतिनिधी / काणकोण
मान्सूनपूर्व पावसाने दिलेल्या तडाख्यात काणकोणच्या कदंब बसस्थानकावरील दुकानांत पाणी शिरल्याने या ठिकाणच्या व्यावसायिकांचा बराच माल खराब झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून या तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. त्यातच वादळी वाऱयाचा परिणाम या व्यावसायिकांना भोगावा लागत असून संपूर्ण बसस्थानक जलमय झाले आहे.
या बसस्थानकाच्या छप्परावर पत्रे बसविण्याचे काम सध्या चालू असून मागच्या पंधरा दिवसांपासून हे काम चालू आहे. एका बाजूचे खराब झालेले पत्रे हटविणे आणि त्या जागी नवीन बसविण्याचे काम पूर्ण झालेले आहे. खराब झालेले पत्रे हटविणे, त्यानंतर लोखंडी खांबांना रंग काढणे यामुळे त्याचप्रमाणे बसस्थानक मोठे असल्यामुळे काम पूर्ण व्हायला थोडा विलंब झाला आहे. तरी देखील येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याची हमी ठेकेदाराने दिली आहे.