प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा तिढा अद्याप कायम असून माजी मंत्री रमेश तवडकर आणि उपसभापती असलेले काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्यासाठी 12 रोजी मडगावच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मतदान करवून घेण्यात आले. यावेळी पक्षाचे केंद्रीय संघटनमंत्री सी. टी. रवी, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किशनकुमार रेड्डी, गोव्याचे संघटनमंत्री सतीश धोंड, दक्षिण गोवा भाजपाचे सरचिटणीस सर्वानंद भगत उपस्थित होते.
यासाठी काणकोण भाजप मंडळाचे प्रमुख सदस्य, 59 बुथांवरील अध्यक्ष आणि सचिवांना बोलाविण्यात आले होते. या बैठकीत काही महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यात जिल्हा पंचायत सदस्या तसेच काही नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी सरपंच, काही पंच, भाजपाच्या उमेदवारीवर दावा करणारे तवडकर आणि फर्नांडिस हे उपस्थित होते. विशेष म्हणजे एक-दोन सरकारी कर्मचारी जे बीएलओ म्हणून काम करतात ते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही मतदान केले, अशी माहिती मिळाली आहे. उपस्थित कार्यकर्त्यांकडून उमेदवारीसंदर्भात इजिदोर की रमेश याबाबतीत मतदान करवून घेण्यात आले. धोंड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले. काणकोण मतदारसंघात 2017 च्या निवडणुकीच्या वेळी देखील विजय पै खोत की रमेश तवडकर असा पेच निर्माण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी चार-पाच बैठका घेतल्या होत्या आणि अखेर भाजप सरकारात महत्त्वाची खाती असलेल्या तवडकर यांना डावलून पै खोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तवडकर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ होऊन इजिदोर फर्नांडिस विजयी झाले होते. तो धोका परत भाजपाला पत्करायचा नाही असे चित्र या बैठकीवरून दिसून आले. त्यामुळे एक-दोन दिवसांत हा तिढा सुटण्याची शक्यता दोन्ही दावेदारांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.