कार्यकर्त्यांच्या बैठकीत दोन गटांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची, इजिदोर फर्नांडिस यांना उमेदवारी देण्याची बहुसंख्यांकडून मागणी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या रमेश तवडकर आणि इजिदोर फर्नांडिस समर्थक असे दोन गट झाले असून त्याचे प्रत्यंतर परत एकदा राजबाग, तारीर येथील हॉटेल पॅन्टाकॉनमध्ये शुक्रवारी बोलाविलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या वेळी आले. यापूर्वी उमेदवारीसंबंधी मतदान करण्यासाठी मडगावच्या भाजप कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीच्या वेळी दोन्ही गटांमधील सुंदोपदी उघड झाली होती. काणकोण मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते एकसंध असल्याचे वर वर जरी दिसत असले, तरी आतून दोन्ही गटांमध्ये आग धुमसत असून त्याचा अनुभव शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित राहिलेले भाजपाचे काणकोण मतदारसंघातील निरीक्षक सुनील हेगडे आणि द. गोवा भाजपाचे सरचिटणीस सर्वानंद भगत यांनी घेतला.
काणकोण मतदारसंघातील उमेदवारी इजिदोर फर्नाडिस यांना द्यायला हवी असे म्हणणारा एक गट असून काहींच्या मते रमेश तवडकर यांना ती मिळायला हवी. दोन्ही दावेदारांनी मतदारसंघात आपल्या प्रचारकार्याला प्रारंभ केला आहे. तवडकर यांनी महिला मोर्चा, युवक मेळावे अयोजित करतानाच वाडय़ावाडय़ावर बैठका घेऊन आदिवासी समाजाला संघटित करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे, तर उपसभापती फर्नांडिस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून आपले मत स्पष्ट केले आहे.
सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचनेनंतर खडाजंगी
भाजपाची उमेदवारी नेमकी कोणाला हे सध्या गुलदस्त्यात असून उमेदवारी कोणालाही मिळो, सर्वांनी पक्षासाठी काम करण्याच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना देण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली असल्याचे सर्वानंद भगत यांनी स्पष्ट केले. या बैठकीला बूथ समित्यांचे अध्यक्ष, सचिव, शक्तीप्रमुख तसेच मंडळ समितीच्या पदाधिकाऱयांना बोलावलेले असून जे या समित्यांवर नसतील त्यांनी सभागृहाबाहेर जावे, अशी सूचना मंडळ अध्यक्ष नंदीप भगत यांनी केल्यानतंर दुर्गेश वारीक, संजीव तिळवे, प्रभाकर गावकर व अन्य सदस्य भगत यांच्यावर तुटून पडले आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
यावेळी दिवाकर पागी, दामोदर च्यारी, समीर देसाई, लक्ष्मण शेट, नगरसेवक हेमंत गावकर, विकास प्रभू यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला मंडळ समितीचे प्रशांत देसाई, सूरज ना. गावकर, वल्लभ टेंगसे, दया गावकर, जगदीश गावकर, डॉ. पुष्पा अय्या, महेश नाईक, शैलेश पागी, दीक्षा पागी, सचिन नाईक, चंदा देसाई, रूदेश नमशीकर, नगरसेवक धीरज गावकर, शुभम कोमरपंत, सुप्रिया देसाई, शेखर देसाई, नीतू देसाई, बाबू पांगळो वेळीप, धिलोन वेळीप, विंदा सतरकर, सिद्धार्थ देसाई, भूषण प्रभुगावकर, लक्षावती वेळीप, विशाल देसाई आणि अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुसंख्य कार्यकर्त्यांचा कल फर्नांडिसकडे
या बैठकीला स्थानिक पत्रकारांना मनाई करण्यात आली होती. मात्र एकंदर परिस्थितीवरून या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी बहुसंख्य कार्यकर्ते काणकोणची उमेदवारी तवडकर यांना सोडून फर्नांडिस यांना मिळायला हवी या मताचे असल्याचे दिसून आले. या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हेगडे आणि भगत यांनी केला असला, तरी भाजपातील बंडखोरी अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या बैठकीस उपस्थित असलेल्यांना रमेश वा इजिदोर यांच्या नावाची शिफारस करण्याची सूचना निरीक्षकांनी केल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी हात वर करून इजिदोर यांच्या नावाला दुजोरा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
विजय पै खोत यांनी माघार घेण्याची विनंती फेटाळली
दरम्यान, भाजपाचे निरीक्षक सुनील हेगडे यांनी 13 रोजी रात्री काणकोण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास सज्ज झालेले माजी आमदार विजय पै खोत यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार विजयी व्हायला हवा आणि त्यासाठी पै खोत यांनी निवडणूक लढवू नये, अशी विनंती हेगडे यांनी केली असली, तरी पै खोत यांनी ती फेटाळून लावली असल्याची माहिती मिळाली आहे.