मालवाहू वाहन संरक्षक कठडा मोडून दरीत कोसळण्याची घटना, क्लिनर गंभीर जखमी
प्रतिनिधी /काणकोण
मडगावहून कारवारच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारे मालवाहू वाहन मनोहर पर्रीकर बगलमार्गावरील रस्त्याच्या बाजूचा संरक्षक कठडा मोडून 20 मीटर इतक्या खोल दरीत पडण्याची दुर्घटना 18 रोजी रात्री घडली. या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून सुदैवाने चालक बचावला आहे.
वेगाने आलेल्या या मालवाहू वाहनाने रस्त्याच्या उजव्या बाजूच्या कठडय़ाला धडक देऊन मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. त्याचवेळी सदर वाहनाचे टायर फुटल्यामुळे वाहनावरील ताबा जाऊन सदर वाहन मुठाळ पुलापासून अवघ्याच अंतरावर खाली कोसळले. सदर वाहनाच्या फुटलेल्या चार टायरपैकी एक भाग तुटून रस्त्यावर पडला. वाहनातील लोखंडी पट्टय़ा रस्त्यावर इतस्ततः विखुरल्या. सुदैवाने या गंभीर अपघातामध्ये प्राणहानी झाली नाही. या अपघाताची खबर मिळताच काणकोणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल वाहनचालक सिंगप्पा याला ताब्यात घेतले, तर जखमी क्लिनरला उपचारासाठी काणकोणच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काणकोण पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन देसाई पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चार रस्ता ते माशे मनोहर पर्रीकर बगलमार्ग म्हणजे सध्या अपघातप्रवण क्षेत्र झालेले असून दिवसाकाठी एक तरी अपघात या रस्त्यावर आता व्हायला लागला आहे.