असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत घेतला निर्णय, पाच वर्षांत कधी सुडाचे राजकारण न केल्याचे उद्गार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील भाजपाची उमेदवारी नाकारलेले काणकोणचे माजी आमदार तथा माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी यंदाची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार असल्याची घोषणा आपल्या असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत केली.
लोलये येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या या बैठकीला काणकोण भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष नंदीप भगत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी, काणकोणच्या माजी नगराध्यक्षा नीतू देसाई, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, आगोंदचे सरपंच बादल ना. गावकर, माजी सरपंच प्रमोद फळदेसाई, खोतीगावचे सरपंच दया गावकर, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, गावडोंगरीच्या सरपंच अंजली गावकर, लोलयेचे सरपंच सचिन नाईक, नगरसेवक धीरज गावकर, माजी सरपंच अजय लोलयेकर, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, पंच विद्या गायक, भाजपाच्या कार्यकारिणीचे सदस्य सूरज ना. गावकर हे उपस्थित होते. या सर्वांनी फर्नांडिस यांच्या कार्यप्रणालीबद्दल मते व्यक्त करून त्यांनी अपक्ष उमेदवार या नात्याने निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले.
भाजप वापरा व फेका वृत्तीचा
या बैठकीला पैंगीण, लोलये, आगोंद, खोतीगाव, गावडोंगरी पंचायतीतील पंच तसेच पालिकेतील नगरसेवक उपस्थित होते. त्यात शुभम कोमरपंत, शैलेश पागी, निशांत प्रभुदेसाई, रूद्रेश नमशीकर, खोतीगावच्या पंच भावना देसाई, श्रीमती मडिवाळ तसेच शेखर देसाई, श्रीस्थळचे माजी सरपंच प्रशांत देसाई, भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा फिओना फर्नांडिस, कुष्टा गावकर आणि अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. भाजप हा पक्ष वापरा आणि फेका या वृत्तीचा असल्याचे मत यावेळी बहुतेकांनी मांडले. फर्नांडिस हे हजारोंच्या मताधिक्याने विजयी होतील आणि त्यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्वास बहुतेकांनी यावेळी व्यक्त केला. नंदीप भगत यांनी माजी मंत्री रमेश तवडकर यांना जी उमेदवारी भाजपाने दिली आहे त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. त्यात बदल करावा आणि ही जागा राखावी, असे आवाहन त्यांनी केले.
25 वर्षांनंतर पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात
आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपण कधी सुडाचे राजकारण केले नाही. काणकोण मतदारसंघातील विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याला खूप सहकार्य केले. आपल्याला उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक पक्ष आपल्या संपर्कात आले. मात्र आपल्या समर्थकांचा निर्णय तो आपला निर्णय मानून आपण सर्वांना परतवून लावले, असे फर्नांडिस यांनी सांगितले. 25 वर्षांपूर्वी पहिली निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढविली होती. परत यंदा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असून आतापासून कामाला लागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. कॅजी डिसिल्वा यांनी केले. लोलयेचे सरपंच सचिन नाईक यांनी स्वागत केले, तर अनिल कामत यांनी आभार मानले.