युतीचे उमेदवार जनार्दन भंडारी यांना पूर्ण पाठिंबा : गोवा फॉरवर्डने युतीचा धर्म पाळला : प्रशांत नाईक
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष संघटितपणे लढविणार असून गोव्यातील अन्य मतदारसंघांतील उमेदवारांनी देखील हा आदर्श घेऊन कामाला लागावे, असे आवाहन काणकोणचे काँग्रेस उमेदवार जनार्दन भंडारी आणि गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी प्रशांत नाईक यांनी केले आहे.
चावडीवरील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड नेत्यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे उमेदवार भंडारी, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत, महिला गटाच्या अध्यक्षा उर्सिला डिकॉस्ता, युवक काँग्रेस गट अध्यक्ष वैष्णव पेडणेकर, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, विकास भगत, रॅमी बोर्जिस आणि उमेश तुबकी उपस्थित होते.
गोवा फॉरवर्डने युतीचा धर्म पाळला असून भाजपाच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. गोव्यातील या पक्षांची संयुक्त अशी ही पहिलीच बैठक आहे. भाजपाचे कपट, कूट नीती आणि विश्वासघात दूर करण्यासाठी भंडारी यांच्याबरोबर गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते घरोघरी फिरणार आहेत. भंडारी हे लढावू व्यक्तिमत्त्व असून काँग्रेसने एका सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. सध्या भाजपाने बाजार मांडताना आयाराम गयारामचे राजकारण सुरू केले आहे. त्याला छेद देऊन भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसविण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन प्रशांत नाईक यांनी केले.
काणकोण तालुक्यात ज्या ज्या वेळी अन्याय झालेला आहे त्या प्रत्येक वेळी आपण धावून आलेलो आहे. वादळ, कोरोना महामारीच्या काळात आपण सर्व प्रकारचे सहकार्य केलेले आहे. आजवर पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. त्यामुळे आपल्याला सर्व जण सहकार्य करतील, जे सध्या बाजूला आहेत ते सर्व जण संघटितपणे काम करतील, असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला. यावेळी विकास भगत, रॅमी बोर्जिस, उर्सिला डिकॉस्ता, वैष्णव पेडणेकर यांनी मते मांडली आणि युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.